ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - जगाला आज विकासाच्या नव्या इंजिनाची गरज आहे. भारत जागतिक विकासाचे नवे इंजिन बनून आपले योगदान द्यायला तयार आहे. भारताची अर्थव्यवस्था जितकी वाढेल त्याचे अनेक फायदे जगाला होणार आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिकन उद्योगपतींना संबोधित करताना सांगितले.
यावेळी जगाला विकासाच्या नव्या इंजिनाची गरज आहे. नवे इंजिन लोकशाहीचे असेल तर फार चांगले आहे. जागतिक विकासाचे नवे इंजिन बनून आपले योगदान द्यायला भारत सज्ज आहे असे मोदींनी सांगितले. आपल्या सरकारची उद्योगअनुकूल धोरणे आणि राबवलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आपल्या सरकारच्या धोरणांमुळे भारत आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यांनी अमेरिकन उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करुन उत्पादन कारखाने सुरु करण्याचे आवाहन केले.
भारत आज फक्त बाजारपेठ न रहाता त्यापुढे गेला आहे. भारत आज विश्वासर्ह सहकारी असून, भारतीय अर्थव्यवस्थेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळत आहे ते मोदींनी अमेरिकन उद्योजकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. भारत-अमेरिका भागीदारीचा दोन्ही देशांना फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी सरकारने निर्णायक पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.