काठमांडू- नेपाळला यशाचे शिखर सर करताना मदत करण्यासाठी भारत शेर्पा होण्यासाठी तयार आहे असे विधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काठमांडू येथे केले. काठमांडूमध्ये नेपाळ सरकारतर्फे नागरी स्वागत झाल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. काल जनकपूर येथे जानकी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी काठमांडूमध्ये नेपाळच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री व इतर मंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. तर आज पंतप्रधानांनी मुक्तीनाथाचे आणि पशुपतीनाथाचे दर्शन घेतले. काठमांडूच्या भाषणाच्या शेवटी 'नेपाल-भारत मैत्री अमर रहोस' असा त्यांनी नेपाळी भाषेत तीनवेळा जयघोषही केला. पंतप्रधानांचा दोन दिवसांचा दौरा संपला असून ते नवी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत.
काठमांडू येथे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, "नेपाळने युद्ध ते बुद्ध (युद्धापासून शांततेपर्यंत) प्रवास केला आहे. बुलेटपासून बॅलटपर्यंत प्रवास केला आहे, मात्र आता इथेच थांबून चालणार नाही, अजून लांबचा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. आता तुम्ही एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचला आहात. एव्हरेस्ट चढणे बाकी आहे. ज्याप्रमाणे शेर्पा लोक गिर्यारोहकांना मदत करतात त्याप्रमाणे नेपाळला यशाचं शिखर सर करण्यासाठी भारत शेर्पाची भूमिका स्वीकारायला तयार आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काठमांडू शहराच्या वैशिष्ट्यांचे कौतुकही केले. पंतप्रधानांना भेट म्हणून बुद्धमूर्ती देण्यात आली. गेल्या दोन दिवसांमध्ये नेपाळचे पंतप्रधान खडग् प्रसाद शर्मा ओली आणि नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर चर्चा केली आणि अरुण 3 या प्रकल्पाची पायाभरणी केली. यामुळे भारत आणि नेपाळ दोन्ही देशांना वीज मिळणार आहे. काल पंतप्रधानांनी दोन्ही देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रामायण सर्किट सुरु करणार असल्याचे सांगितले तसेच जनकपूर ते अयोध्या बससेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज ही बस भारतात येऊन पोहोचली आहे.