ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 13 - भारताच्या वाढत्या नौदल सामर्थ्याची पाकिस्तानने धास्ती घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजिज यांनी अण्वस्त्र स्पर्धेला भारत जबाबदार असून, हिंदी महासागरात सामर्थ्य वाढवून भारत सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. भारताच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या आण्विक शक्तीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधल्या कराची येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. पाकिस्तानचा 95 टक्के व्यापार हा हिंदी महासागरातून होतो. हिंदी महासागरात भारतानं आण्विक परीक्षण केल्यास पूर्ण क्षेत्र प्रभावित होऊन धोको वाढण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, हिंदी महासागरात विदेशी सैन्याकडून संचलन, सामूहिकरीत्या नाश करणा-या शस्त्रास्त्रांचं परीक्षण, क्षेपणास्त्र क्षमता वाढवल्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली आहे. तसेच तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनमध्ये भारतानं 'सिक्रेट न्यूक्लिअर सिटी' बनवल्याचंही छापण्यात आलं होत. त्यामुळे दक्षिण आशियात संतुलन बिघडण्याची भीती आहे. भारत आण्विक शस्त्रास्त्रे जमा करत असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नफीस जकारिया यांनीसुद्धा केला आहे.
अण्वस्त्र स्पर्धेला भारत जबाबदार- सरताज अजिज
By admin | Published: February 13, 2017 11:52 AM