ऑनलाइन लोकमतझुकोवस्की, दि. 19 - पाचव्या पिढीतील लढाऊ विमानं तयार करण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यात लवकरच करार होणार आहे, असे रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशनचे सीईओ सेर्जेई केमेझोव्ह यांच्या मते, पाचव्या पिढीतील लढाऊ विमानं बनवण्यासाठी करावयाच्या अब्जावधींच्या कराराशी संबंधित सर्व निर्णय लवकरच घेण्यात येणार आहेत. भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये 2007मध्ये सरकारी पातळीवर करार झाला होता. पाचव्या पिढीतील विमानं विकसित करण्यासाठी भारत आणि रशिया लवकरच करारबद्ध होणार आहेत. याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यावर चर्चा केली जातेय. येत्या काळात पाचव्या पिढीतील लढाऊ विमानं विकसित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असंही रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशनचे सीईओ सेर्जेई केमेझोव्ह म्हणाले आहेत. भारतीय लष्कराला हवाई सामर्थ्य वाढवण्यासाठी ताफ्यामध्ये शेकडो आणि किमान 200 लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. जगभरातल्या अनेक कंपन्या ही संधी घेण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु जर ही विमानं भारतात बनवली तरच घेऊ, अशी भूमिका भारतानं घेतल्याचे इंडियन एअर फोर्सच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. सद्य स्थितीत रशियाची जुनी विमानं भारताच्या ताफ्यात आहेत, त्या विमानांनाही निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे लष्कराला हवाई सामर्थ्य मजबूत करण्यासाठी 300 लढाऊ विमानांची लागणार आहेत. तर 200 विमानं लवकरात लवकर हवीच आहेत. फ्रान्सच्या राफेलबरोबर 36 विमानांच्या खरेदीचा करार भारताने आधीच केला आहे. आणखी किमान 200 विमानं खरेदी करण्यासाठी 12 ते 13 अब्ज डॉलर्सची गरज लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न असलेलं मेक इन इंडिया हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून विदेशी कंपन्यांना भारतात विमान उत्पादनाचा प्रस्ताव देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रशिया आणि भारत पाचव्या पिढीतील विमानं विकसित करणार आहेत. भारतामध्ये विमान उत्पादन क्षेत्रानं वेग घ्यायला हवा, अशी मोदी सरकारची भूमिका आहे. लष्कराच्या विमान खरेदीमध्येही मेक इन इंडियाचा आग्रह धरण्यात येत आहे. लॉकहीड मार्टिन या अमेरिकी कंपनीने भारतामध्ये कारखाना सुरू करण्यात आणि भारतीय लष्करासाठी F-16 ची विमाननिर्मिती करण्यात रस दाखवला आहे. त्याशिवाय येथून विमानांची निर्यातही करण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे.
तर प्रतिस्पर्धी असलेल्या स्वीडनच्या साब या कंपनीनेही भारतामध्ये कारकाना सुरू करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. संरक्षण खात्याने भारतामध्ये लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी कारखाना उभारण्याची तयारी आहे का अशी विचारणा अनेक कंपन्यांकडे केली आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाबद्दलही भूमिका स्पष्ट करण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
याआधी राफेलशी 126 लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव होता. भारतात उत्पादन करण्यावरून भारत सरकार व राफेलमध्ये मतभेद झाले आणि अखेर ही खरेदी 36 विमानांइतकी मर्यादीत करण्यात आली. लॉकहीड मार्टिन या कंपनीने तर भारतामध्ये एफ - 16 या विमानांची एक्सक्लुझिव्ह निर्मिती करण्याची तयारी दर्शवली आहे. लढाऊ विमानांच्या उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या लॉकहीड मार्टिनच्या सप्लाय चेनचा एक भाग होण्याची संधी भारतीय उद्योगाला आम्ही देऊ इच्छित असल्याचे लॉकहीड मार्टिनचे नॅशनल एग्झिक्युटिव्ह अभय परांजपे यांनी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटलं होतं.