India-Russia talks : रशियाची भारताला स्पेशल ऑफर! युद्ध काळातच लावरोव्ह यांनी दिला खास प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 08:36 PM2022-04-01T20:36:52+5:302022-04-01T20:37:38+5:30
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह गुरुवारी रात्री उशिरा चीनवरून दिल्लीत आले.
नवी दिल्ली - भारतात तेलाचा पुरवठा वाढविण्यासाठी रशियाने आता एक खास ऑफर दिली आली आहे. युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी असलेल्या तेलाच्या दरावर प्रति बॅरल 35 डॉलर एवढी सूट देण्याचा प्रस्ताव रशियानेभारतासमोर ठेवला आहे. नुकतेच दिल्लीत आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (Sergei Lavrov) यांनी हा प्रस्ताव दिला आहे.
रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं भारताचं कौतुक -
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह गुरुवारी रात्री उशिरा चीनवरून दिल्लीत आले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान लॅवरोव्ह म्हणाले, "भारत या संपूर्ण परिस्थितीकडे एकतर्फी न पाहता वस्तुस्थितीनुसार पाहत आहे, आम्ही याचे कौतुक करतो."
रुपये-रूबलवर सुरू आहे काम -
युद्धामुळे युक्रेनकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यानंतर, भारताने रशियाकडून विक्रमी दराने सूर्यफूल तेल खरेदी करण्याचा करार केला आहे. वृत्तानुसार, भारत आणि रशिया व्यापार सुलभ करण्यासाठी आणि रशियन बँकांवरील पाश्चात्य निर्बंध दूर करण्यासाठी रुपया-रुबल यंत्रणेवरही दोन्ही देश काम करत आहेत.
या शिवाय, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे, की आम्ही भारताला कुठल्याही प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यास तयार आहोत. भारताला जे आमच्याकडून खरेदी करायचे असेल ते आम्ही देऊ. आम्ही चर्चेसाठीही तयार आहोत. रशिया आणि भारतात(India-Russia) खूप चांगले संबंध आहेत. भारत-रशियाच्या भागीदारीवर कुठल्याही दबावाचा काही परिणाम होईल, अशी शंकाही माझ्या मनात नाही. दुसऱ्यांना त्यांच्या धोरणांवर काम करण्यासाठी मजबूर केले जात आहे, असे म्हणत त्यांनी अमेरिकेवरही नाव न न घेता निशाणा साधला. अमेरिकेच्या दबावामुळे भारत-रशियाच्या संबंधावर परिणाम होईल का? या पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.