India-Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र धोरण आणि इतर देशांशी असलेल्या संबंध, याबाबत नेहमीच चर्चा होते. दरम्यान, आता भारताने रशियासोबतच्या आपल्या पारंपारिक संबंधांना धक्का न लावता, युक्रेनशी आपले संबंध मजबूत करणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन-रशिया परिस्थितीवर चर्चा झाली.
महत्वाची बाब म्हणजे, झेलेन्स्की आणि मोदी यांच्यातील गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी बैठक होती. यावरून हे दिसून येते की, भारत रशिया-युक्रेन वाद सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
शांतता परिषदेकडे रशियाची पाठया भेटीदरम्यान झेलेन्स्की यांनी पुढील शांतता परिषद भारतात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, याबाबत भारताची भूमिका फारशी उत्साहवर्धक नाही. याचे कारण म्हणजे, दोन्ही देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले, तरच भारत शांतता करार करण्यासाठी तयार असेल. पण, युक्रेन वादासंदर्भात स्वित्झर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या शांतता परिषदेत रशियाने सहभाग घेतला नव्हता.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत सांगितले की, 'पीएम मोदी युक्रेनमधील परिस्थितीबद्दल खूप चिंतित आहेत. या बैठकीची विनंती युक्रेनमधूनच आली होती. युक्रेन-रशिया वाद चर्चा आणि मुत्सद्देगिरीनेच सोडवला जावा, अशी आमची इच्छा आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल पीएम मोदी चिंतित आहेतच, पण या संघर्षाचा इतर देशांवर, विशेषत: विकसनशील आणि गरीब देशांवर होणाऱ्या परिणामांबद्दलही ते चिंतेत आहेत.'