वॉशिंग्टन : आगामी काळात भारताच्या चीन आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांमधील तणाव आणखी वाढू शकतो, या दोन देशांनी खोड काढल्यास भारत लष्करी कारवाईने प्रत्युत्तर देऊ शकतो, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने आपल्या अहवालात बुधवारी केला आहे. या दोन देशांना प्रत्युत्तर म्हणून मागील सरकारांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत आपले सैन्य मैदानात उतरवू शकतो, अशी भीती वाढल्याचेही अहवालात म्हटले आहे.
बाह्य धोक्यांचा वार्षिक मूल्यांकन अहवाल अमेरिकी संसदेत सादर करण्यात आला. या अहवालात म्हटले आहे की, चीन आणि भारत सीमेवर सुरू असलेला वाद संवादाच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असूनही दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण होणार आहे.
...तर परिस्थिती नियंत्रणाबाहेरभारत आणि पाकिस्तान यांच्यातील संकट एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. दोन्ही देशांमधील तणावामुळे काश्मीरमध्ये हिंसाचार आणि भारतात दहशतवादी हल्ला झाला तर दोन्ही देशांमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असे अहवालात म्हटले आहे.
भारत-चीन वाद अमेरिकेसाठी धोका
- अमेरिकेच्या गुप्तचर अहवाल २०२० मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन देशांमधील संघर्ष या दशकातील सर्वांत धोकादायक संघर्ष असल्याचे वर्णन करण्यात आले आहे.
- दोन्ही देशांमधील तणावाची परिस्थिती अमेरिका आणि तेथील जनतेसाठी मोठा धोका असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या वादात अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
- युद्धसज्जतेवर चीनचा भर अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सशस्त्र दलांना अधिक वेगाने जागतिक दर्जाच्या सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. युद्ध जिंकण्यासाठी चिनी सैन्याच्या राष्ट्रीय रणनीती आणि युद्ध क्षमता वाढविण्यासाठी नवीन पावले उचलण्यावरही त्यांनी भर दिला.
भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीरच कळीचा मुद्दा
- भारत - पाक संबंधांमध्ये तणाव वाढण्यामागे अमेरिकी गुप्तचरांनी काश्मीर हे महत्त्वाचे कारण मानले आहे.
- २०२१मध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या युद्धविराम करारानंतर दोन्ही देशांना संबंधांमध्ये शांतता राखायची आहे. मात्र, भारतविरोधी
- दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे.
- पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारतही पाकिस्तानच्या कोणत्याही चिथावणीखोर कृत्याला चोख प्रत्युत्तर देईल.