नवी दिल्ली - देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. या देशाने त्यांच्या कर्मामुळे जागतिक व्यवस्थेत मागे राहण्याचा मार्ग निवडला आहे. अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात परंतु काही देश जाणुनबुजून असे निर्णय घेतात ज्याचे परिणाम खूप भयानक असतात अशा शब्दात एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
संयुक्त राष्ट्रे आमसभेत एस जयशंकर बोलत होते, यावेळी ते म्हणाले की, आमच्या शेजारील पाकिस्तान हा यातील प्रमुख उदाहरण आहे. पाकिस्तान नेहमी दुसऱ्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो, तीच स्थिती आज पाकिस्तान गिळंकृत करण्यासाठी तयार आहेत. त्या वाईट गोष्टी त्यांच्याच समाजाचे नुकसान करत आहेत. ते जगाला दोष देऊ शकत नाही. हे फक्त कर्माचे फळ आहे असं त्यांनी खडसावून सांगितले.
तसेच दुर्दैवाने त्यांच्या गैरकृत्यांचा इतरांवर परिणाम होतो, विशेषत: शेजाऱ्यांवर..जेव्हा राजकारणात आपल्या लोकांमध्ये कट्टरता असते तेव्हा त्यांचा जीडीपी केवळ कट्टरपंथ आणि दहशतवादाच्या रुपात मोजला जाऊ शकतो. इतरांच्या जमिनीच्या लालसेपोटी कृत्य करणाऱ्या एका निष्क्रीय राष्ट्राचा पर्दाफाश आणि सामना केला पाहिजे असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं.
दरम्यान, जयशंकर यांनी पाकिस्तानला यासाठी सुनावले कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीरमधील स्थितीची तुलना फिलिस्तानशी केली. पाकिस्तानचा सीमेपलीकडील दहशतवाद कधीही यशस्वी होणार नाही. त्यांच्या कृत्याचे परिणाम शेजारील देशाला भोगावे लागतील असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. पाकिस्तानद्वारे अवैधरित्या कब्जा करण्यात आलेलं भारतीय क्षेत्र(POK) रिकामा करून देणे हे आमच्यातील समस्येवर तोडगा आहे असंही भारताने सांगितले.
पाकिस्ताननं काय म्हटलं होतं?
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुक्रवारी यूएनजीएच्या सभेत त्यांच्या भाषणात जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची तुलना फिलिस्तानशी केली. ते म्हणाले होते की, लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतके संघर्ष केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि काश्मीरी लोकांची इच्छा यावर चर्चा होण्याचा आग्रह पाकिस्तानने धरला. भारताने परस्पर सामरिक संयम व्यवस्थेचा पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला आहे. भारतीय नेतृत्वाने नियंत्रण रेषा (LOC) ओलांडण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.