India slams US America: इस्रायल आणि पॅलेस्टाइन (Israel Hamas War at Palestine) यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धाचा निषेध करत अमेरिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेच्या विद्यापीठात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर निदर्शने (Students Protest) केली जात आहेत. संपूर्ण अमेरिकेतून एकूण २५ विद्यापीठांमध्ये ही निदर्शने सुरु आहेत. यादरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावरून अमेरिकेला चांगलेच सुनावले आहे. अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्य आणि कायदा-सुव्यवस्था याच्यात समतोल साधण्याकडे अमेरिकेने लक्ष द्यावे. दुसऱ्यांना शिकवत बसण्यापेक्षा स्वत: त्या गोष्टींचे पालन करावे, अशी टिप्पणी भारताने केली आहे.
भारतात जेव्हा जेव्हा कोणत्याही मुद्द्यावरून निदर्शने केली जातात, त्यावेळी अमेरिका बहुतांश वेळा त्यात नाक खूपसून टिप्पणी करत असते. त्यामुळे भारताने अमेरिकेच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून हे विधान केले असल्याचे मानले जात आहे. भारताने केलेली ही टिप्पणी एखाद्या टोमण्याप्रमाणे आहे. परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निदर्शनांच्या प्रकरणात आतापर्यंत १०० हून जास्त विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. इस्रायलकडून पॅलेस्टाइनवर होत असलेले हल्ले थांबवले जावेत यासाठी ही निदर्शने सुरु आहेत.