वॉशिंग्टन : अमेरिकेने गेल्या वर्षी भारतीय लष्कराला महत्त्वपूर्ण गुप्तचर माहिती पुरवल्यामुळे चीनच्या घुसखोरीचा यशस्वीपणे सामना करण्यात भारताला मदत झाली, असा दावा करणाऱ्या एका वृत्ताची पुष्टी करता येणार नाही, असे म्हणत अमेरिकेने कानावर हात ठेवले आहे.
व्हाईट हाऊसमधील परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे समन्वयक जॉन किर्बी यांनी सांगितले की, मी याची पुष्टी करू शकत नाही. ‘यूएस न्यूज’ने एका विशेष बातमीत दावा केला आहे की, अमेरिकेच्या सैन्याने गुप्त माहिती भारताशी शेअर केल्यामुळे गेल्या वर्षीच्या अखेरीस हिमालयातील सीमा भागात चीनच्या लष्करी घुसखोरीला भारत यशस्वीरीत्या प्रत्युत्तर देऊ शकला.
९ डिसेंबर रोजी, अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये चकमक झाली. त्यात दोन्ही बाजूंचे काही सैनिक किरकोळ जखमी झाले.
काय आहे दावा?बातमीनुसार, अरुणाचल प्रदेश प्रदेशातील अमेरिकेच्या गुप्तचर आढाव्याच्या अहवालाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, पहिल्यांदाच अमेरिकन सरकारने आपल्या भारतीय समकक्षांना चीनची त्यावेळची स्थिती आणि सुरक्षा दलाच्या सामर्थ्याची माहिती दिली. माहितीमध्ये उपग्रहाच्या छायाचित्रांचा समावेश आणि अधिक तपशीलवार माहिती दिली आहे. याआधी कधीच अमेरिकन लष्कराने अशी माहिती इतक्या वेगाने दिली नव्हती.
ते वाटच पाहत होतेबातमीत म्हटले आहे की, ‘ते वाटच पाहत होते. हे घडले कारण अमेरिकेने भारताला तयारीसाठी सर्व काही दिले होते. यावरून दोन्ही सैन्य आता गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करत आहेत हे दिसून येते.’