ढाका/ नवी दिल्ली : बांगलादेशमधील दिनाजपूर जिल्ह्यात भावेशचंद्र रॉय (५८) या हिंदू नेत्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सुरक्षेला असलेला धोका आणखी वाढला आहे.
रॉय यांच्या हत्येचा भारताने शनिवारी (दि. १९) तीव्र निषेध केला. बांगलादेशातील हंगामी सरकारने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी, असे भारताने म्हटले आहे.
भावेशचंद्र रॉय हे बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेच्या बीराल शाखेचे उपाध्यक्ष असून, तेथील हिंदू समाजातील ते मान्यवर व्यक्ती आहेत. रॉय यांचे घरातून गुरुवारी अपहरण केल्यानंतर काही तासांतच ते गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ते घरी आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी अपहरणकर्त्यांनी आधी त्यांना दूरध्वनी केला होता, असा संशय त्यांच्या पत्नी शांतना रॉय यांनी व्यक्त केला.
‘अल्पसंख्याक रक्षणाचे कर्तव्य बांगलादेशने नीट पार पाडावे’
रॉय यांना नरबारी गावात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेबाबत भारताने शनिवारी म्हटले आहे की, बांगलादेशातील अल्पसंख्याकाचा छळ सुरू असून, रॉय यांची हत्या हा त्याचाच भाग आहे. त्या देशात हंगामी सरकारच्या कार्यकाळात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हे गुन्हे करणाऱ्या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. बांगलादेशातील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य हंगामी सरकारने नीट पार पाडावे, असेही भारताने म्हटले आहे.
या कारणामुळे दोन्ही देशांत तणाव
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकार विरोधात तेथील जनतेने आंदोलन केले. त्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन त्या बांगलादेश सोडून भारतात रवाना झाल्या. या घटनेनंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असून तो बऱ्याचअंशी कायम आहे.