ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५- मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीतील दिरंगाईचा भारताने शुक्रवारी जोरदार विरोध दर्शवला. भारताने पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा कडाडून विरोध दर्शवला आहे.
२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयात खटला सुरु असून लागोपाठ सातव्यांदा या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. यापूर्वी २५ जून रोजी न्यायाधीश अनुपस्थित असल्याने खटल्याची सुनावणी टळली. तर २८ मे, ४ जून, १८ जून आणि २ जुलैरोजी होणारी सुनावणी दोन्ही पक्षाचे वकिल उपस्थित नसल्याने टळली होती. यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा निषेध केला. तर पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनीही इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या अधिका-यांना पत्र पाठवून या घटनेचा विरोध दर्शवला. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व आरोपींना पाकने न्यायालयासमोर हजर करुन लवकरात लवकर खटल्याचा निकाल लावावा अशी मागणीही भारतीय अधिका-यांनी पाककडे केली आहे.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात १६६ निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर सुरक्षा दलाचे शेकडो जवान या हल्ल्यात जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयात लष्कर ए तोयबाचा ऑपरेशन कमांडर झकीऊर रेहमान लखवी, अब्दूल वाजीद, मजहर इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहीद जमीन रियाज, जमील अहमद आणि अंजूम या सात जणांविरोधात खटला सुरु आहे. कट रचणे, आर्थिक सहाय्य करणे आणि कट पूर्णत्वास नेणे असा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.