बँकॉक - थायलंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे स्वासदी मोदी कार्यक्रमातून भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीथायलंडसोबतभारताचे असलेले नाते हे हृदय, विश्वास, आत्मा आणि अध्यात्माचे नाते असल्याचे सांगितले. तसेच आधुनिक काळात भारत आणि थायलंडमधील दळणवळणाच्या सुविधा वाढत आहेत, दोन्ही देशांदरम्यान आठवडाभरात 300 विनामांची ये जा होते, तसेच भारतामधील 18 ठिकाणे थेट थायलंडशी जोडली गेली असल्याचेही मोदींनी सांगितले. यावेळी आपल्या सरकारने केलेली विविध विकासकामे तसेच कलम 370 हटवण्यासाठी उचललेल्या पावलांचाही उल्लेख केला.
अमेरिकेत झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाप्रमाणे बँकॉकमध्ये सवास्डी मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ''प्राचीन काळातील सुवर्णभूमी असलेल्या थायलंडमध्ये तुम्हा सर्वांसोबत असताना कुठे परदेशात आलो आहे, असे वाटत नाही. हे वातावरण, ही वेशभूषा पाहिल्यावर सर्वत्र आपलेपणाचा भास होतो. तुम्ही केवळ भारतीय वंशाचे आहात म्हणून नव्हे तर थायलंडच्या कणाकणात जनमनात आपलेपणा झळकतो.'' यावेळी थायलंडसोबत असलेल्या उत्तम दळणवळणाचा उल्लेखही मोदींनी केला. दोन्ही देशांदरम्यान आठवडाभरात 300 विनामांची ये जा होते, तसेच भारतामधील 18 ठिकाणे थेट थायलंडशी जोडली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशातील 130 कोटी नागरिक नवा भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहा सात वर्षांपूर्वी भारतात जाऊन आलेल्यांनी पुन्हा देशाला भेट देऊन देशात घडत असलेले बदल पाहावेत, असे आवाहन मोदींनी यावेळी केले. यावेळी आपल्या सरकारने पाच वर्षांत केलेली कामे आणि त्याला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सरकारला दिलेल्या जनादेशाचाही उल्लेख केला. "यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांसोबत महिलांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत 60 वर्षांनंतर प्रथमच एक अशी घटना घडली. ती म्हणजे पाच वर्षे सरकार चालवल्यानंतर त्याच सरकारल्या आधीच्यापेक्षा मोठा जनादेश मिळाला आहे. 60 वर्षांपूर्वी असे एकदा घडले होते. गेल्या पाच वर्षांत केलेल्या चांगल्या कामामुळेच हा जनादेश मिळाला."असे मोदींनी सांगितले. त्याबरोबरच दहशतवाद आणि कलम 370 चा उल्लेखही मोदींनी केला. दहशत आणि दहशतवादासाठी कारणीभूत ठरलेली गोष्ट हटवण्याचे काम आम्ही केले. कलम 370 हटवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला, असे मोदींनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी उभे राहून मोदींना दाद दिली. ही दाद भारतातील प्रत्येक खासदारासाठी शक्ती बनेल, अशा शब्दात मोदींनी आभार मानले.