रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करताना दिसत आहेत किंवा त्या मार्गावर तरी आहेत. याला रशियाचा जुना मित्र असलेला क्युबाही अपवाद नाही. आधी कोरोना महामारी आणि आता युक्रेन युद्ध, यामुळे या कॅरेबियन देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. महत्वाचे म्हणजे, क्युबाचा अत्यंत जवळचा मित्र असलेला रशिया युक्रेन युद्धात व्यस्त असताना, भारत क्युबाला ही मोठी मदत करत आहे.
पर्यटन, हा क्युबाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार. मात्र, कोरोना महामारीमुळे याला मोठा फटका बसला. विशेष म्हणजे, यामुळे 2020-21 मध्ये क्युबाचा आर्थिक विकास दर तब्बल 10 टक्क्यांनी घसरला होता. दिलासादायक बाब म्हणजे, 2021-22 मध्ये, यात 2 टक्क्यांची सुधारणाही झाली आहे.
भारत क्युबाला अन्न-धान्याची कमतरता दूर करण्यासाठी लवकरच मदत म्हणून 100 दशलक्ष युरोच्या लाईन ऑफ क्रेडिटचा (एलओसी) विस्तार करेल. यासंदर्भात, माध्यमांशी बोलताना, क्युबाचे राजदूत एलेजांद्रो सिमांकास मारिन म्हणाले, सहकार्यासाठी चार मुख्य क्षेत असू शकतात. यात बायोफार्मसी, अक्षय ऊर्जा, आयटी आणि कृषी क्षेत्रात दोन्ही बाजू एकमेकांना पूरक ठरू शकतात.
याच वेळी, आमची भारतीय ट्रॅक्टर आयात करण्याची इच्छा आहे. तसेच, अन्न प्रक्रिया उद्योगात भारताने आणखी गुंतवणूक करावी, अशी आमची इच्छा आहे, अेही एलेजांद्रो सिमांकास मारिन यांनी म्हटले आहे.