चीनने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवाद्याला पाठीशी घालण्याचं काम केलं आहे. चीनने संयुक्त राष्ट्रांमध्ये लष्कर एक तोयबाचा दहशतवादी साजीद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी आणण्यात आलेल्या प्रस्तावात चीनने मोडता घातला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेने हा प्रस्ताव सादर केला होता. भारत हा या प्रस्तावचा सहसूचक होता. या प्रस्तावावर चीनने व्हिटो वापरल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्रांसमोरच चीनचा बुरखा फाडला आहे.
भारताने गतवर्षी मुंबईत झालेल्या यूएनएससीच्या बैठकीत २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी साजीद मीर यांचा ऑडिओ ऐकवला होता. त्यात तो दहशतवाद्यांना सूचना देत होता. साजीद मीर हा सध्या पाकिस्तानमध्ये आहे. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याने तो मोस्ट वाँटेड आहे.
चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा प्रतिबंधक समितीअंतर्गत जागतिक दहशतवादी म्हणून मीरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यास आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात मोडता घातला होता. याआधी सप्टेंबरमध्येही चीनने संयुक्त राष्ट्रांमध्ये साजिद मीर याला दहशतवागी घोषित करण्याच्या प्रस्तावात आडकाठी केली होती.
दरम्यान, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना काही काळापूर्वी साजीद मीरचा मृत्यू झाला, असा दावा केला होता. मात्र पाश्चात्य देशांनी त्याच्या मृत्यूचा पुरावा मागितला होता. साजीद मीर हा २००१ पासून लष्कर ए तोयबाचा सक्रिय सदस्य आहे. २००६ ते ११ या काळात तो लष्करच्या बाहेरील मोहिमांचा प्रभारी होता. मुंबईत झालेल्या हल्ल्याप्रकरणी एप्रिल २०११ मध्ये मीर याला अमेरिकेत आरोपी ठरवण्यात आले होते.