न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘खूपच बुद्धिमान व्यक्ती (व्हेरी स्मार्ट मॅन) आणि ‘चांगला मित्र’ (ग्रेट फ्रेंड), अशा शब्दांत प्रशंसा केली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी शुल्कविषयक (टेरिफ) वाटाघाटी उत्तम होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विदेश सचिव विक्रम मिस्त्री आणि अमेरिकी परराष्ट्र उपमंत्री क्रिस्टोफर लँडौ यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाटाघाटीच्या दिवशीच ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान मोदी अलीकडेच इथे आले होते. आम्ही नेहमीच चांगले मित्र राहिलो आहोत.’ ट्रम्प प्रशासनाने भारतासह अनेक देशांवर लावलेला समतुल्य कर २ एप्रिलपासून लागू होत आहे. त्याच्या तोंडावर ट्रम्प यांचे हे वक्तव्य आले आहे.
‘सर्वाधिक कर लावणारा ही बाब निष्ठुर आणि निर्दयी’ट्रम्प यांनी म्हटले की, ‘भारत हा जगातील सर्वाधिक कर लावणाऱ्या देशांपैकी एक आहे. ही बाब निष्ठुर आणि निर्दयी आहे. ते (मोदी) खूप बुद्धिमान व्यक्ती आहेत आणि माझे चांगले मित्रही आहेत. आमची चर्चा खूप चांगली राहिली. भारत आणि आमचा देश यांच्यात उत्तम काम होईल, असे मला वाटते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्हाला खूप महान पंतप्रधान लाभला आहे.’