ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 5 - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही तपास न करता काही तासातच भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कोलांटीउडी मारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही युद्धाविरोधात आहोत, आम्हाला शांतता हवी आहे. काश्मीरचा मुद्दा आम्ही शांततेने सोडवायचा आहे असंही नवाज शरीफ बोलले आहेत. संसदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना नवाज शरीफ यांनी दहशतवादी बु-हान वाणीचं पुन्हा एकदा उदात्तीकरण करत त्याला नायक ठरवला. भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याच्या उलट्या बोंबा मारत उरी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणीही नवाज शरीफ यांनी केली. काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी जगातील देशांनी प्रयत्न करायला हवे असंही नवाज शरीफ बोलले आहेत.
१८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले.
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.
भारत-पाकिस्तानदरम्यान १९४९ साली कराची करार झाला, तेव्हापासून ७७५ कि.मी. अंतराच्या नियंत्रण रेषेला शस्त्रसंधी रेषा म्हणून ओळखले जात होते. १९७१पासून ती एलओसी म्हणून ओळखली जाते. तेव्हापासून प्रथमच भारतीय सैन्याने एलओसी ओलांडून थेट पीओकेमध्ये प्रवेश केला. गतवर्षी म्यानमारमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक केला होता. मात्र जाहीरपणे त्याची कबुली दिली नव्हती. यंदा मात्र पीओकेतील दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केल्याची जाहीर कबुली दिली.