इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात पुन्हा वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. जर पाकिस्तानी सैन्याने योग्य निर्णय घेतला नाही तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करेल, असा इशारा दिला आहे. भारतीय थिंक टँक वेगवेगळे कट रचत आहे, म्हणून मी हे बोलत असल्याचे इम्रान खान म्हणाले.
पंतप्रधान पदावरून हाकलल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानात एका मागोमाग एक सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना दुबईवरून नवे कोरे हेलिकॉप्टर देण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर कोणी दिले हे त्यांनी सांगितलेले नाही.
पाकिस्तान आत्महत्या करण्याच्या वाटेवर आहे, जर योग्य निर्णय घेतले नाही तर पहिली शिकार सैन्य असेल आणि आपली युक्रेनसारखीच अण्वस्त्रे जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. इम्रान खान यांनी एका चॅनेलला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत. पाकिस्तानवर दिवाळखोर होण्याचे संकट आहे. ही पाकिस्तान आणि सैन्याची खरी समस्या आहे. तुम्हाला मी लिहून देतो, पाकिस्तानी सैन्य संपून जाईल. जेव्हा देश बर्बाद होईल तेव्हा जग सांगेल की अण्वस्त्रांचा त्याग करा, जसे १९९० मध्ये युक्रेनमध्ये झालेले, असेही ते म्हणाले.
परदेशातील भारतीय थिंक टँक स्वतंत्र बलुचिस्तान देश निर्माण करण्यासाठी तयारी करत आहे. त्यांच्या तशा योजनाच आहेत, यामुळे मी दबाव आणत आहे, असे इम्रान खान म्हणाले. शाहबाज शरीफ हे अमेरिकेला खूश करण्यासाठी काहीही करतील, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.