ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 3 - भारत आणि चीनचा सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र चीननं भारतासोबत असलेला हा सीमावाद मिटवण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधल्या तवांगच्या बदल्यात भारताला स्वतःच्या ताब्यातील दुसरा भूभाग देण्याची तयारी दर्शवली आहे. चीनचे माजी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी दायी बिंगुओ यांनी एका मुलाखतीत याचे संकेत दिले आहेत. त्यांनी तवांगच्या बदल्यात अक्साई चीनच्या दुस-या भूभागाच्या देवाण-घेवाणीबाबत सूतोवाच केले आहेत. तवांग हा भारत आणि चीन या सीमेकडच्या पूर्वेतील सामरिक आणि राजनैतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील भूभाग आहे.भारताच्या सीमावादावर चीनचे माजी वरिष्ठ कम्युनिस्ट नेते दायी बिंगुओ एका पब्लिकेशन हाऊसला मुलाखत दिली होती. 2013 साली निवृत्त होण्याआधी दायी बिंगुओ यांनी दशकाहून अधिक काळ भारतासोबत चीनचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारत-चीनच्या सीमेच्या वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र तवांग या भूभागाची देवाण-घेवाण भारतासाठी सहजशक्य नाही. कारण तवांग मठ तिबेट आणि भारतातल्या बौद्ध धर्मीयांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. परंतु दायी यांच्या सूचक वक्तव्यालाही महत्त्व प्राप्त झालं आहे. कोणतीही अधिकृत मान्यता असल्याशिवाय दायी असं वक्तव्य करणार नाहीत, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दायी अजूनही चीन सरकारच्या खूप जवळचे समजले जातात. तसेच राजकीयदृष्ट्या चीनमध्ये त्यांना गांभीर्यानं घेतलं जातं. कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीशिवाय दायी मुलाखतीत याची वाच्यता करणार नाहीत, असं अनेकांचं म्हणणं आहे. दायी म्हणाले, चीनच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे सीमेचे वाद अद्यापही सुरूच आहेत. पूर्वेकडे भारतानं चीनची काळजी घेतल्यास चीनही त्याच्या मोबदल्यात (अक्साई चीन) इतर भूभाग देण्याचा विचार करेल. दायी यांनी गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. 2005पासून चीननं भारताच्या पूर्वेकडच्या क्षेत्रात लुडबुड करण्यास सुरुवात केल्याचंही चीन संबंधित विश्लेषक श्रीकांत कोंडापल्ली यांनी सांगितलं आहे. तवांगवर चीनची नजर आहे आणि त्याला तो दक्षिण तिबेट म्हणून संबोधतो. 15व्या शतकात दलाई लामा यांचा येथेच जन्म झाला. भारतासोबत झालेल्या1962च्या युद्धात चीन या क्षेत्रातून मागे हटला होता. तवांगवर चीननं अधिपत्य स्थापन केल्यास तिबेट आणि पर्यायानं बौद्ध केंद्रांवर त्यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.
तवांगच्या बदल्यात भारताला मिळणार अक्साई चीन ?
By admin | Published: March 03, 2017 7:32 AM