नवी दिल्ली : भारताने दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या आयोडिनयुक्त स्वस्त मिठाच्या पेटेंटची लढाई जिंकली आहे. दांडीयात्रा काढून इंग्रजांविरुद्ध आंदोलन छेडणारे महात्मा गांधी आज हयात असते तर त्यांनाही २१ व्या शतकातील या मिठाच्या सत्याग्रहाबद्दल अभिमान वाटला असता.दैनंदिन वापराच्या आयोडिनयुक्त मिठाच्या पेटेंटसाठी चालू असलेल्या कायदेशीर प्रदीर्घ संघर्षात गुजरातच्या भावनगर येथील सार्वजनिक क्षेत्रातील एका प्रयोगशाळेने बाजी मारली. ‘सेंट्रल सॉल्ट अॅन्ड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सीएमएमसीआरआर) या प्रयोगशाळेने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) या बहुराष्ट्रीय कंपनीचे आव्हान मोडित काढले.१९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढून मिठाचा सत्याग्रह चालविल्याची परिणती भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली. या सत्याग्रहाला ८५ वर्षे झाली असताना मिठाची लढाई कितीतरी पटीने वाढली होती. कायदेशीर लढाईतील यशामुळे भारताला बौद्धिक संपदा अधिकाराचे रक्षण करता येणार आहे. प्रदीर्घ कायदेशीर संघर्ष सदर प्रयोगशाळेची मूळ शाखा असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) २००४ मध्ये नव्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या आयोडिनयुक्त मिठाच्या उत्पादनाच्या पेटेंटसाठी अर्ज केला होता. तेव्हापासूनच कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला. २००६ मध्ये तत्कालीन हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड सध्याची एचयूएलने पेटेंटला विरोध केला होता. सीएसआयआरने नावीन्यपूर्ण असे काहीही केले नसल्याने पेटेंट रद्द करण्याची मागणी या कंपनीने केली. चढउताराचा हा कायदेशीर संघर्ष दीर्घकाळ सुरूच राहिला. २०१३ मध्ये भारतीय पेटेंट कार्यालयाने पेटेंट देण्यास नकार दिला. त्यामुळे एचयूएलने लढाई जिंकल्यात जमा होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आयोडिन मिठाची लढाई भारताने जिंकली
By admin | Published: August 09, 2015 10:30 PM