मॉस्को - हिंदी मालिकांच्या छोट्या पडद्यावर गेली १८ वर्षापासून अभिनय करणाऱ्या अभिनेत्याला मॉस्को विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. करणवीर बोहरा असं या अभिनेत्याचे नाव असून पासपोर्ट फाटलेला असल्याने त्याला मॉस्को विमानतळावर सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. पासपोर्ट फाटलेला असल्याने करणवीरला आपला दौरा आटोपता घ्यावा लागणार होता. कारण त्याला मॉस्को विमानतळावरुन परत भारतात पाठविण्यात आले असते. मात्र, तात्काळ तात्पुरता नवा कोरा पासपोर्ट मिळाल्याने त्याच्यावर येणारं संकट टळलं. तात्पुरता पासपोर्ट मिळाल्याने करणवीरने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि भारताचे आभार व्यक्त करणारा ट्विट देखील करणवीरने केला.
करणवीर बोहरा याने मॉस्को विमानतळावर पाच तासापासून बसून ठेवण्यात आलं होतं. माझे पासपोर्ट फाटले असल्याने मला विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले असल्याचे ट्विट करणवीर याने केले आहे.
‘आज एक धक्का बसला. माझा पासपोर्ट फाटलेला असल्याने मला मॉस्को विमानतळावर सिक्युरिटी चेकच्या वेळी बाजुला घेण्यात आले. ते मला भारतात परत पाठविण्याचा प्रयत्न करत आहेत. मॉस्को, रशियातील भारतीय दूतावासाने तुम्ही मला व्हिसा देण्यापूर्वी याविषयी कल्पना द्यायला हवी होती’ असे ट्विट करणवीरने केले आहे.
करणवीरच्या या ट्विटनंतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान, अभिनेता हितेन तेजवानी, रघू राम, करण पटेल, मनिष पॉल, विकास गुप्ता, राजेश खट्टर, राज कुंद्रा ट्विट करत भारतीय दूतावासाला लवकरात लवकर करणवीरची समस्या दूर करण्याची विनंती केली आहे.