कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. भारत सरकारने हे आरोप गांभीर्याने घ्यावेत आणि आमच्यासोबत एकत्र काम करावे, अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद
ट्रुडो म्हणाले की, मी आधी म्हटल्याप्रमाणे आम्हाला या घटनेमागे भारत सरकारचा हात असल्याची ठोस माहिती मिळाली आहे. मला वाटते की निःपक्षपाती न्यायप्रणाली असलेला देश म्हणून आपण अत्यंत सचोटीने काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की हे आरोप हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सर्वांसमोर मांडण्याचा निर्णय अतिशय गांभीर्याने घेण्यात आला आहे.
ट्रुडो म्हणाले की, कायद्याचे पालन करणारा देश म्हणून निःपक्षपातीपणे तपास करणे ही आपली जबाबदारी आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कायदेशीर व्यवस्थेचे पालन करतो याची आम्हाला खात्री करायची आहे. आपल्या भूमीवर आपल्या नागरिकाच्या हत्येमागे कोणताही देश खपवून घेतला जाणार नाही.
'मी पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधला. यावेळी मी या विषयावर बोललो. भारत सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी आमची इच्छा आहे. या प्रकरणात संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी आमच्यासोबत काम करा. आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत. आम्ही कॅनेडियन नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि आमच्या मूल्यांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलण्याच्या दिशेने कार्य करत राहू, असंही ट्रुडो म्हणाले.
ट्रुडो म्हणाले की, 'सध्या आमचे लक्ष यावर आहे. आम्ही न्यायिक व्यवस्थेच्या अंतर्गत आमचे काम करत राहू. अशा परिस्थितीत भारत सरकारने या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी आमच्यासोबत काम करावे अशी आमची इच्छा आहे.