India vs Canada : भारत आणि कॅनडामधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाचे हे आरोप भारताने फेटाळून लावले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पुन्हा एकदा कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांच सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यानंतर भारताने तातडीने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅनडाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना ट्रूडो सरकारचा हा राजकीय अजेंडा असल्याचं भारताने म्हटलं. आता कॅनडातील पोलिसांनी गंभीर आरोप केला आहे.
भारताच्या कारवाईने हताश झालेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता भारतावर आरोप करत आहेत. भारताने कॅनडाच्या नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी कारवाया करू शकतात असा विचार करून चूक केल्याचे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं आहेत. यासोबतच भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगबरोबर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पत्रकार परिषदेत केला आहे. कॅनडातील भारतीय गुप्तहेर खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत, असे कॅनडा पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र याबाबत त्यांनी याबाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत.
भारताने सोमवारी आपले उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकारी यांना परत बोलावण्याची घोषणा केली. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांना लक्ष्य केलं जात असल्याने त्यांना परत मायदेशी बोलावले आहे. यासोबतच भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून त्यांना १९ ऑक्टोबरपूर्वी भारत सोडण्यास सांगितले आहे. शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या तपासात कॅनडाने संजय वर्मा यांचा उल्लेख केल्याने भारताने ही कारवाई केली आहे.
भारताच्या या कारवाईनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ओटावा येथे पत्रकार परिषदेत घेत भारताला इशारा दिला. ट्रूडो यांनी भारत सरकारवर कॅनडातील गुन्हेगारी कारवायांचे समर्थन करून चूक केल्याचा आरोप केला. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या तणावाबाबत बोलताना ट्रुडो यांनी सिंगापूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या आगामी बैठकीच्या महत्त्वावर भर दिला. "गेल्या आठवड्याच्या शेवटी जेव्हा मी पंतप्रधान मोदींशी बोललो तेव्हा मी सिंगापूरमध्ये आमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमधली बैठक किती महत्त्वाची असेल हे त्यांना सांगितले. त्यांना त्या बैठकीची माहिती होती आणि मी त्यांना सांगितले की ही बैठक अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे," असं ट्रुडो म्हणाले.
दुसरीकडे, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी आरोप केला की भारत सरकारचे गुप्तहेर कॅनडाच्या भूमीवर दहशत पसरवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत. "आपण पाहिले आहे की संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर केला जात आहे आणि एक टोळी यासाठी जबाबदार आहे. बिश्नोई टोळीचे भारतातील गुप्तहेरांशी संबंध आहेत," असे पोलिसांनी म्हटलं आहे. ३१ वर्षीय लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबचा गुंड असून तो सध्या अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा मुंबई पोलिसांना संशय असताना कॅनडाच्या पोलिसांनी हे आरोप केले आहेत.