रविवारी तालिबाननंअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर बिघडलेली परिस्तिती पाहता भारतानं त्या ठिकाणी असलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली होती. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचं विमान जवळपास १२० भारतीयांना काबुलवरून जामनगर येथे घेऊन आलं. महत्त्वाची बाब ही की अफगाणिस्तानमधील भारताचे राजदुत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. हवाई दलाचं C-17 हे विमान जामनगर येथे उतरवण्यात आलं.
भारतीय हवाई दलाचं C-17 हे विमान हे विमान मंगळवारी सकाळी काबुलहून रवाना झालं होतं. यामध्ये भारतीय दुतावासातील कर्मचारी, त्या ठिकाणी असणारे सुरक्षा कर्मचारी आणि काही भारतीय पत्रकारांचा समावेश होता. गुजरातमधील जामनगर येथे उतरल्यानंतर या विमानाचं स्वागत करण्यात आलं. अफगाणिस्तानमधून परत आलेल्या लोकांचं फुलांच्या माळा घालून स्वागत करण्यात आलं. तसंच यानंतर बसमध्ये बसल्यावर सर्वांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.
बिघडलेली परिस्थिती पाहता काबुल विमानतळावर विमानांचं उड्डाण बंद करण्यात आलं होतं. परंतु अमेरिकन लष्कराद्वारे या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा विमानांची ये-जा सुरू करण्यात आली. यानंतरच भारतीय विमान या ठिकाणाहून उड्डाण घेऊ शकलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये भारतीय नागरिकांना परत आणलं जात असल्याचं दिसत आहे. भारत सरकारद्वारे अफगाणिस्तानसाठी निराळ्या मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.