वॉशिंग्टन : अमेरिकेच्या काँग्रेसवर निवडून गेलेल्या चार भारतीय अमेरिकनांनी आमचा अभूतपूर्व विजय हा आम्ही मुख्य राजकीय प्रवाहाचा भाग बनल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या चार भारतीयांमध्ये दोन महिला आहेत. कमला हॅरीस या सिनेटवर तर हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजवर प्रमिला जयपाल, राजा कृष्णमुर्ती आणि रो खन्ना निवडून गेले आहेत. या चौघांच्या विजयाचा आनंद भारतीय अमेरिकन समाज साजरा करीत आहे. डेमोकॅ्रटिक काँग्रेसमन अॅमी बेरा हे फेर मतमोजणीत विजयी असल्याचे घोषित झाले तर या चौघांमध्ये आणखी एकाची भर पडेल. बेरा विजयी झाले तर ते त्यांचे सलग तिसरे यश असेल. २०१२ व २०१४ मध्ये बेरा विजयी झाले होते. या लोकांचे यश हे छोटे नाही तर ते साजरे करण्याएवढे महत्वाचे असल्याचे सिलिकॉन व्हॅलीत राहणारे गुंतवणूकदार व समाजसेवी एम. आर. रंगास्वामी यांनी म्हटले. या पाच जणांपैकी बहुतेकांसाठी रंगास्वामी यांनी निधी गोळा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते. हे भारतीय अमेरिकन देशाच्या मुख्य प्रवाहातील राजकारणाचा भाग बनले हे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या ताज्या ऐतिहासिक निवडणुकीपासून प्रेरणा घेऊन अन्य भारतीय अमेरिकनांनी फक्त काँग्रेसच्या निवडणुका लढवाव्यात, असे नाही तर ते राज्य आणि शहर पातळीवरील निवडणुकांही लढवतील अशी आशा रंगास्वामी यांनी व्यक्त केली. कॅलिफोर्नियाचे अजय जैन- भुटोरिया यांनीही भारतीय अमेरिकनांसाठी निधी गोळा केला होता. ते म्हणाले, ‘‘भारतीय अमेरिकनांसाठी ही अभिमानाची बाब आहे.’’ अमेरिकेमध्ये खूप वेगाने भारतीय अमेरिकनांची संख्या वाढत आहे त्यांनी यावर्षी संपूर्ण देशातून निधी गोळा केला. त्यासाठी कार्यक्रम आयोजित केले. टम्पा फ्लोरिडामध्ये राजा कृष्णमुर्ती यांच्या निधीसाठी कार्यक्रम घेण्यात आला तर ग्रेटर वॉशिंग्टन भागात रो खन्ना, जयपाल च काँग्रेसची निवडणूक लढविणाऱ्या इतरांसाठीही कार्यक्रम घेण्यात आले.
भारतीय अमेरिकन बनले राजकीय प्रवाहाचा भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2016 4:39 AM