प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी बातमी आहे. जगातील सुप्रसिद्ध 'नासा' (Nasa) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राची सुत्रं भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेच्या हाती देण्यात आली आहेत. भारतीय वंशाच्या डॉ. भव्या लाल यांची 'नासा'च्या प्रमुख कार्यवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ( Bhavya Lal appointed acting chief of staff of Nasa )
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी डॉ. भव्या लाल यांचं नाव निवडलं आहे. "भव्या लाल यांना अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा चांगला अनुभव आहे. भव्या लाल नासाच्या इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट्स प्रोग्राम आणि नासा अॅडव्हायझरी कौन्सिलच्या तंत्रज्ञान, नाविन्य आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या बाह्य परिषदेच्या सदस्य देखील राहिल्या आहेत", असं 'नासा'नं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कोण आहेत डॉ. भव्या लाल?डॉ. भव्या लाल यांनी २००५ ते २०२० पर्यंत इन्स्टिट्यूट फॉर डिफेंस अॅनालिसिस साइंस अँड टेक्नोलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूट (STPI)च्या रिसर्च स्टाफच्या सदस्य म्हणून काम पाहिलं आहे. STPI मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या C-STPS LLC च्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. याशिवाय त्या 'केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी'च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राच्या संचालक होत्या. अमेरिकेच्या न्यूक्लियर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं आहे.
भव्या लाल यांनी अणु विज्ञानात बीएससी आणि एमएससी पदवी प्राप्त केली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय अकॅडमी ऑफ अॅरोनॉटिक्सच्या प्रतिनिधी म्हणूनही निवड झाली होती. यासोबतच तंत्रज्ञान आणि धोरण विभागातही पदवी प्राप्त केली आहे. सार्वजनिक धोरण आणि प्रशासनात त्यांनी डॉक्टरेट केली आहे.