टेक्सास/नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचे काही ठराविक प्रथिन घट्ट धरून ठेवून त्यांना सक्रिय होण्यास प्रतिबंध करू शकेल, असा कण (मॉलिक्यूल) भारतीय-अमेरिकन शाळकरी मुलगी अनिका चेब्रोलू (१४) हिने विकसित केला आहे. या शोधामुळे कोविड-१९ वरील संभाव्य उपचार उपलब्ध होऊ शकेल.
अनिका चेब्रोलू ही येथील फ्रिस्कोत आठव्या वर्गात शिकते. अमेरिकेत अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्याया माध्यमिक शाळा विज्ञान स्पर्धेत अनिकाने थ्री एम यंग सायंटिस्ट चॅलेंज जिंकले.
हा पुरस्कार तिला औषधाच्या शोधात इन-सिलिको हे शिस्तबद्ध पद्धतीचे शास्त्र वापरण्याच्या कामासाठी मिळाला. हे काम तिने कोरोना विषाणूवर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांत सार्स-कोव्ह-२ विषाणूच्या स्पाईक प्रोटीनला घट धरून ठेवील असा कण शोधण्यासाठी केले, असे थ्रीएम चॅलेंज संकेतस्थळाने म्हटले.