भारतीय लष्कराने सोमवारी कॉंगोमध्ये धाडसी कारवाई करत ऑपरेटिंग तळ आणि तिथल्या लेव्हल III हॉस्पिटलची लूट करण्याचा काही नागरी सशस्त्र गटांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय जवानांनी दाखवलेल्या या शौर्याचं जगभर कौतुक होऊ लागलं आहे.
"कॉंगो (MONUSCO) मधील संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेत काही नागरी सशस्त्र गटांनी संयुक्त राष्ट्रांच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर लूट करण्याचा प्रयत्न केला होता. तसंच UN कार्यालय संकुलांची तोडफोड करण्यात आली आहे. सध्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे", असं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
MONUSCO मध्ये तैनात भारतीय लष्करी तुकड्या हे बहुपक्षीय संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षक दलाचा भाग आहेत जे संयुक्त राष्ट्राच्या आदेशानुसार संघर्षग्रस्त प्रदेशाच्या स्थिरीकरणासाठी योगदान देत आहेत. याआधी 22 मे रोजी काँगोमधील FARDC (कॉंगोली आर्मी) आणि MONUSCO (काँगोमधील लोकशाही प्रजासत्ताकातील संयुक्त राष्ट्र मिशन) स्थानांवर सशस्त्र गटाने केलेल्या हल्ल्याला भारतीय लष्कर आणि UN ध्वजाखाली इतर देशाच्या सैन्यानं रोखलं होतं.
संयुक्त राष्ट्राच्या शांतीरक्षणाच्या जागतिक मिशनमधील १४ पैकी ८ ठिकाणांवर तैनात असलेल्या सैन्यात भारतीय लष्कर आघाडीवर आहे. भारतीय लष्कर अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहे. सध्या ५,४०० हून अधिक लष्करी कर्मचारी संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली आव्हानात्मक परिस्थितीत तैनात आहेत.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, लेबनॉन, दक्षिण सुदान, गोलान हाइट्स, सीरिया, वेस्टर्न सहारा, अबेई आणि सायप्रस येथील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये भारतीय सैन्याची लक्षणीय उपस्थिती आहे. संयुक्त राष्ट्र अंतरिम सुरक्षा दल फॉर अबेई (UNISFA) मध्ये भारतानं एक पायदळ बटालियन गट देखील तैनात करत आहे. भारताने आतापर्यंत १५ फोर्स कमांडर, दोन लष्करी सल्लागार, संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे एक उप-सैन्य सल्लागार, दोन डिव्हिजन कमांडर आणि संयुक्त राष्ट्रांच्या विविध मोहिमांमध्ये आठ उप फोर्स कमांडर दिले आहेत.