वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले डोनॉल्ड ट्रम्प यांनी भारतीय कॉल सेंटरमधील एका प्रतिनिधीच्या इंग्रजीत बोलण्याच्या पद्धतीची नक्कल करताना त्याची थट्टा केली; पण त्याचवेळी त्यांनी भारत एक महान देश असल्याचे सांगितले. आपण भारतीय नेत्यांशी नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय आणि मेक्सिकन लोक लहान मुलांनी कॅन्डी पळवावी त्याप्रमाणे अमेरिकेतील नोकऱ्या पळवत आहेत, असा आरोपही ट्रम्प यांनी केला.ट्रम्प हे न्यूयॉर्कचे अब्जाधीश आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेत किंवा परदेशात राहणाऱ्या आपल्या ग्राहकांना सेवा देते काय? याची माहिती काढण्यासाठी आपण आपल्या क्रेडिट कार्ड कंपनीला फोन केला होता. त्यावेळी आपण एका भारतीय व्यक्तीशी बोलत आहोत आणि ती कसे काम करते, याचा अंदाज बांधण्यासाठीच मी एक बहाणा म्हणून आपल्या क्रेडिट कार्डबाबत माहिती विचारली आणि आपण कोठून आलात? असे विचारले. त्यानंतर कॉल सेंटरमधून आलेल्या उत्तराची माहिती देताना त्यांनी भारतीय प्रतिनिधीच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीची नक्कल केली. (वृत्तसंस्था)