इस्लामाबाद : भारतीय टीव्ही चॅनल्सचे कार्यक्रम अवैधरित्या प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामकाने दिला आहे. तसेच भारतीय टीव्ही चॅनल्सच्या कार्यक्रमांचे प्रसारण एकूण प्रसारण वेळेच्या सहा टक्क्यांहून कमी ठेवण्याचे निर्देशही दिले. विविध चॅनलचे मालक आणि सामान्य नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण अर्थात पेमराने हे पाऊल उचलले. स्थानिक चॅनल्सना आचारसंहिता ठरवून देण्यात आली आहे. तिचे उल्लंघन केल्यास संबंधित टी. व्ही. चॅनल्सवर कडक कारवाई केली जाईल. ज्या टी. व्ही. चॅनल्सकडे परवानगी आणि परवाना आहे तेच चॅनल्स परदेशी कार्यक्रम प्रसारित करू शकतात, असे पेमराचे प्रमुख अब्सार आलम यांनी सांगितले. पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सना १५ आॅक्टोबर २०१६ पासून भारतीय टीव्ही चॅनल्सवरील कार्यक्रमांचे प्रक्षेपण सहा टक्क्यांहून कमी ठेवावे लागेल. अवैधरित्या भारतीय टीव्ही कार्यक्रम प्रक्षेपित करणाऱ्यांना ४५ दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर उल्लंघन केल्यास दंड ठोठावला जाणार आहे. भारतीय डिश वापरणे हे कायद्याचे उल्लंघन तर आहेच शिवाय ते राष्ट्रीय हिताच्या विरुद्धही आहे. त्यामुळे मी लोकांना बेकायदा भारतीय डिश न वापरण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले. भारतीय चित्रपट, नाटके आणि रियलिटी शो पाकिस्तानात लोकप्रिय असून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग आहे. (वृतसंस्था)
पाकमध्ये टीव्हीवर भारतीय चॅनल्स बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2016 2:36 AM