ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 14 - सौदी अरेबियातल्या वाळवंटात गेल्या 24 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेले भारतीय नागरिक गना प्रकासम राजामरीयन (52, रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) लवकरच भारतात परतणार असल्याची आनंदाची बातमी मिळते आहे. सरकारने 90 दिवस माफीचा कालावधी दिला आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. गना हे ऑगस्ट 1994मध्ये हैल प्रांतातील एका गावात शेती करण्यासाठी आले होते. तामिळनाडूतील कन्याकुमारीला राहणारे राजमरियन म्हणाले, माझ्या पहिल्या मालकानं सहा महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला फक्त 100 सऊदी रियाल दिले होते. त्यानंतर माझी दोन मालकांकडे बदली झाली. त्यामुळे माझा स्पॉन्सर कोण हेच मला नक्की माहीत नाही. मला त्यांच्याकडून पगारही मिळाला नाही. त्यामुळे मी बेकायदेशीरपणेच इथे राहू लागलो. माझं नशीब हे वाळवंटातच होते. येथेच मी माझं अर्धे आयुष्य इथे घालवलं आहे. मी घर सोडलं तेव्हा माझी चौथी मुलगी खूपच तरुण होती. ज्या वयात मी घर सोडलं त्या वयाची आता माझी नातवंडे आहेत. सौदी अरेबियातील कमाईवर मी माझ्या तीन मुलींचं लग्न करून देण्यास सक्षम होतो. मात्र आता माझ्याजवळ स्वतःच घर नाही. तसेच आधार कार्ड आणि मतदान कार्डही नाही. मी माझ्या पत्नीला 2015मध्ये शेवटचा फोन केला, त्यावेळी तिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर माझं तिच्याशी कधीच बोलणं झालं नाही आणि हल्लीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे अनेक भारतीय प्रवासी सौदी अरेबियात अनधिकृतरीत्या वास्तव्य करत आहेत. त्यांना भारतात येण्याची इच्छा असून, सौदीतील कायद्यामुळे परतताना अडचणी येत आहेत. रियादमधल्या भारतीय दूतावास आणि जेद्दातल्या वाणिज्य दूतावासकडे आणीबाणीच्या प्रवासाकरता 26,713 अर्ज करण्यात आले आहेत. त्यातील उत्तर प्रदेशमधल्या 11,390, तेलंगणा 2733, प. बंगाल 2022, केरळ 1736, बिहार 1491, आंध्र प्रदेश 1120 आणि राजस्थानमधील 853 लोकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. भारतातील जवळपास हजारोंहून अधिक निर्वासित हे अनधिकृतपणे सौदी अरेबियात प्रवास करत आहेत.
सौदीत बेकायदा राहणारा भारतीय नागरिक परतणार
By admin | Published: June 14, 2017 10:28 PM