शिकागो : अमेरिकेत २००८ मध्ये पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याप्रकरणात एका भारतीय व्यक्तीस दोषी ठरविण्यात आले आहे. लक्ष्मीनिवास नेरूसू (४६) असे दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला हत्याप्रकरणी भारतातून अमेरिकेत आणण्यात आले होते. ‘डेट्रॉईट फ्री प्रेस’ या वृत्तपत्राच्या मते, आॅकलँड काऊंटीच्या न्यायाधीशांनी नेरूसूला दोषी ठरविले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणताही अपराध भाव दिसत नव्हता. त्याने परिवारातील तिघांची हत्या केल्याच्या आरोपाचा इन्कार केला नाही. येत्या तीन जुलै रोजी मिशिगन येथील न्यायालय त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावेल. १३ आॅक्टोबर २००८ मध्ये नेरूसू याने पत्नी, मुलगी आणि मुलगा अशा तिघांची अमेरिकेत हत्या करून दुसऱ्या दिवशी हैदराबाद गाठले होते. (वृत्तसंस्था)
प्रत्यार्पण केलेला भारतीय हत्येचा दोषी
By admin | Published: June 14, 2014 3:57 AM