ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 16 - ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत चमकदार कामगिरी करत असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या स्थितीचे वर्णन आंधळ्यांच्या राज्यातला एकाक्ष राजा असे केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह जगातल्या प्रमुख संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. जागतिक प्रतिकूल परिस्थितीचा भारतावर कमीत कमी दुष्परिणाम व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये आरबीआयचाही मोलाचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर राजन व्यक्त करत असलेल्या मतांना महत्त्व देण्यात येत आहे.
संपूर्ण समाधानी व्हावं अशी स्थिती अद्याप नसल्याचं सांगताना, आंधळ्यांच्या प्रदेशातला एकाक्ष राजा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था असल्याचं प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
भारतामध्ये गुंतवणुकीला वेग येत आहे आणि स्थैर्यही येत असल्याचे एका मुलाखतीत ते म्हणाले.
चालू खात्यातील तसेच वित्तीय तूट कमी झाली आहे, त्याचप्रमाणे महागाईचा दरही 11 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे राजन यांनी सांगितले. त्यामुळे व्याजदरांमध्ये आणखी कपात करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.