ऑनलाइन टीम
सिंगापूर, दि. २४ - गरीब बायकांना परवडणारी सॅनिटरी नॅपकिन्स बनवणा-या भारतीय उद्योजकांनी उत्पादनाचा दर्जा तपासण्यासाठी ही नॅपकिन्स स्वत: वापरल्याची अभिनंदनीय घटना घडली आहे. जगातल्या ७० विकसनशील देशातल्या गरीब महिलांनी हायजिनिक नॅपकिन्स वापरावीत आणि मासिक पाळीच्या काळात शरीरास अपायकारक जुन्या पद्धतीना सोडावं या हेतुनं हा उद्योग सुरू केल्याचं मुळचे कोईम्बतूरचे असलेल्या अरुणाचलम मुरुगनंथम यांनी सांगितले. स्वत:च्या पत्नीला मासिक पाळीच्या काळात अत्यंत खराब कपड्यांची कास धरावी लागत असल्याचं बघितल्यानंतर स्वस्त व हायजिनिक सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याचा चंग अरुणाचलम यांनी बांधला.
आत्तापर्यंत १७ देशांमध्ये ही मशिन्स वापरली जात असून गावागावांमधल्या गरीब महिलांनी ही मशिन्स वापरून स्वस्तामध्ये सॅनिटरी नॅपकिन्सचं उत्पादन करायचं अशी ही पद्धत आहे. जवळपास साडेसात वर्षांच्या प्रयत्नांनतर अरुणाचलम यांनी बनवलेले हे यंत्र अवघ्या एक लाख रुपयांमध्ये मिळते. भारतामधल्या प्रत्येक महिलेने मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स वापरावीत हे आपले लक्ष्य असल्याचे अरुणाचलम सांगतात.
या मशिनमुळे जवळपास १० लाख महिलांना रोजगार मिळेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. या वर्षीच्या जगातल्या प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीमध्ये अरुणाचलम मुरुगनंथम यांचा समावेश आहे.