ऑनलाइन लोकमत
व्हॅनकोवर, दि. १७ - काही मुलांकडे लहान वयातच अचाट प्रतिभा असते, ही मुले आपल्यातील ही अंगभूत हुशारी आणि प्रतिभेने समोरच्याला थक्क करुन सोडतात. अशाच मुलांपैकी एक आहे १० वर्षांची इशिता कटियाल. पुण्याची रहिवासी असलेल्या १० वर्षाच्या इशिताने कॅनडातील व्हॅनकोयुव्हेर शहरात झालेल्या टीईडी २०१६ (टेक्नोलॉजी, एंटरटेनमेंट, डिझाईन) परिषदेत आपल्या भाषणाने सर्वांचीच मने जिंकून घेतली.
टीईडी ही बुध्दीवंतांची परिषद समजली जाते. या परिषदेला गुगल, टेसला, अॅपल, अशा बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. टीईडी परिषदेची सुरुवात इशिताच्या संबोधनाने झाली. मुलांना प्रथम प्राधन्य आणि मुलांना संधी द्या या विषयावर इशिताने संबोधित केले. दीड महिन्यापूर्वी पुण्यात झालेल्या लोकमतच्या महिला संमेलनाच्या कार्यक्रमातही इशिता सहभागी झाली होती.
मोठे झाल्यावर तुम्हाला काय बनायचे आहे असे मुलांना विचारण्यापेक्षा आता त्यांना काय बनायचे आहे ते विचारा. इशिता संबोधित करत असताना संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. वर्तमानात आपण मुलांसाठी भरपूर काही करु शकतो. पण सध्या जगात अशा भरपूर शक्ती आहे ज्या मुलांच्या स्वप्नांविरोधात काम करत असल्याचे तिने सांगितले.
इशिताच्या भाषणा दरम्यान अनेक वाक्यांवर प्रेक्षकांनी टाळया वाजवून तिला दाद दिली. भूक, शिक्षण, युध्द या विषयांवर मुलांच्या नजरेतून मते मांडून तिने उपस्थितांची मने जिंकून घेतली.
अवघ्या दहा वर्षाच्या इशिताने सिमरन्स डायरी म्हणून पुस्तक लिहीले आहे. बालेवाडीतील विबग्योर शाळेत शिकणा-या इशिताने आपल्या शाळेत टीईडी परिषद आयोजित केल्यानंतर तिचे हे पुस्तक चर्चेत आले.