इस्लामाबाद : भारताचा स्वातंत्र्य दिन असलेला १५ आॅगस्ट हा दिवस पाकिस्तानने काळा दिवस म्हणून पाळला आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून ते दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.भारताने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. भारतासोबतचे व्यापार आणि वाहतूक संबंध तोडत त्यांनी निषेधाचा सूर आळवला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनीही गुरुवारी पानावर काळी चौकट प्रसिद्ध केली तर तेथील सर्वच नेते, रेडिओ पाकिस्तान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलून ते काळे केले. पाकिस्तानी नागरिकांनीही घराचे छत आणि गाड्यांवर काळे झेंडे लावले. इस्लामाबादसह सर्वच प्रमुख शहरांत तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्येही भारतविरोधी मोर्चे काढण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने बाळगलेल्या शांततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टिष्ट्वटद्वारे इशारा दिला, की मुस्लीम जगात याच प्रश्नावरून गंभीर मतभेद निर्माण होतील. याचे पडसाद म्हणून कट्टरता आणि हिंसाचार वाढीस लागेल.तत्पूर्वी पाकिस्तानने बुधवारी आपला स्वातंत्र्य दिवस ‘काश्मीर एकता दिन’ म्हणून साजरा केला. पाकिस्तानने चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे भारताच्या काश्मीरप्रश्नी भूमिकेविरोधात अपीलही केले आहे.देशातील सर्वांत प्रभावशाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डॉन’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादकीयामध्ये म्हटले आहे की, ‘भारताच्या मुत्सद्दीपणाने काश्मीरप्रश्नी पाकिस्तान एकाकी पडला आणि आता याच प्रश्नावरून जागतिक विरोधाचाही सामना करीत आहे.’ (वृत्तसंस्था)वीज गेली का?पाकिस्तानी नेत्यांनी त्यांची प्रोफाइल काळी केल्याच्या निर्णयाचे भारतीय नेटिझन्समध्ये जोरदार पडसाद उमटले. काहींनी या निर्णयावर टीका केली, तर काहींनी ‘वीज गेलीय का?’ असा तिरकस सवाल करीत या निर्णयाची खिल्ली उडवली.
भारतीय स्वातंत्र्य दिनी पाकचा काळा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 6:49 AM