ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 1 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरीकांना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठी कठोर केलेले इमिग्रेशन धोरण सौम्य केले आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकन काँग्रेसला पहिल्यांदाच संबोधित करताना त्यांनी गुणवत्तेवर आधारीत इमिग्रेशन धोरण अवलंबणार असल्याचे सांगितले. भारतीय आयटी उद्योगातील तज्ञांसाठी ही चांगली बातमी आहे. भारतातून मोठया प्रमाणावर आयटी तज्ञ H-1B व्हिसावर अमेरिकेत जातात.
कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जगातील अन्य देशांमध्ये मेरीट आधारीत इमिग्रेशन धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. मेरीट आधारीत इमिग्रेशन धोरणामुळे पैसा वाचेल आणि कामगारांच्या वेतनात वाढ होईल असे त्यांनी सांगितले. अमेरिकन नागरीकांच्या नोक-या जाऊ नयेत यासाठी त्यांनी इमिग्रेशन धोरण कठोर करण्याचे ठरवले होते.
पण त्यावर चौफेर टीका झाली. लाखो अमेरिकन नागरीकांच्या नोक-या आपण परत आणू असे त्यांनी भाषणात सांगितले. आपल्या कामगाराचे संरक्षण करणे ही सुद्धा एक सुधारणा आहे. सध्याच्या व्यवस्थेमध्ये कामगारांची स्थिती खराब असून, करदात्यावर दबाव येतो असे ट्रम्प यांनी सांगितले. इमिग्रेशन धोरण हे अमेरिकन नागरीकांचे रोजगार आणि वेतनवाढीची पूर्तता करणारे असले पाहिजे असे ट्रम्प यांनी सांगितले.