नवी दिल्ली : तब्बल 100 वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धामध्ये वापरलेले बॉम्बवर्षाव करणारे विमान Airco DH9 पुन्हा उड्डाण भरणार आहे. आश्चर्य वाटले ना, पण हो. बिकानेरच्या राज्याच्या महालामध्ये हे विमान सडलेल्या अवस्थेत होते. या विमानाच्या पुनरुज्जीवित करण्याची गोष्टही फार रंजक आहे.
Airco DH9 हे विमान राजाचे हत्ती बांधण्याच्या जागेवर ठेवण्यात आले होते. दोन दशकांपूर्वी इंग्लंडहून एक प्रेमी जोडपे भारतभ्रमंतीवर आले होते. त्यावेळी ते बिकानेरचा राजवाडा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी या युगुलाला या विमानाचे भग्न अवशेष दिसले. या विमानाला पुन्हा नवीन आयुष्य देण्याचे त्यांनी ठरविले. तेथील राजाच्या वंशजांशी त्यांनी बोलणी केली. त्यांनी हे विमान देण्यासाठी मंजुरीही दिली. या जोडप्याने हे अवशेष अनेक भागांमध्ये इंग्लंडला नेले आणि त्यानंतर या विमानाची पुर्नबांधणी सुरु झाली.
20 वर्षांच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर विमान पुन्हा नव्याने तयार झाले, मात्र विमानाला आजच्या युगातील यंत्रे लावण्यात आली आहेत. यानंतर हे विमान उडविण्याचे दिव्य सुरु झाले. कारण हे विमान उडविण्यासाठी त्या सारखी जुनी विमाने उडविण्याचा अनुभव असलेला पायलट लागणार होता. कारण पहिल्या विश्वयुद्धात वापरलेल्या विमानांमध्ये आणि गेल्या 40 वर्षांतील विमानांमध्ये मोठे बदल झाले होते. यामुळे त्या काळातील विमान उडविणारा कोणी असेल का याचा शोध सुरु झाला.
डॉज बेली नावाचे सेवानिवृत्त पायलट यांना अशी विमाने उडविण्याचा अनुभव होता. कारण ते प्रदर्शनांमध्ये जुनी विमाने उडवत असत. त्यांनी स्वेच्छेने हे विमान 30 मिनिटे उडविले.
राजस्थानच्या बिकानेरमध्ये एका राजवाड्यामध्ये हे विमान होते. जेनिस ब्लैक आणि गाय जेनिस तेव्हा हा राजवाडा पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्या दृष्टीस हे विमान पडले. विमानाचा पत्रा सडला होता. इंजिनही खराब अवस्थेत होते. हे ऐतिहासिक विमान पुन्हा जसेच्या तसे बनविण्यासाठी त्यांनी हे विमान बनविणाऱ्या कंपनीचा शोध घेतला. रेट्रोटेक नावाच्या कंपनीने हे विमान बनविले होते. त्यांच्या इंजिनिअरनी तब्बल 20 वर्षे या विमानावर मेहनत घेतली आणि 100 वर्षांनी पुन्हा या विमानाने गगनभरारी घेतली.