सौदी अरेबियात २०१९ साली सोशल मीडियात एक अपमानजनक पोस्ट केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत असलेला एक भारतीय नागरिक आता मायदेशात परतला आहे. हरीश बंगेरा असं या व्यक्तीचं नाव असून ते सौदी अरेबियात एअर कंडीशन टेक्निशिअन म्हणून काम करत होते. हरीश बंगेरा मूळचे कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील कुंडापूर जवळील बीजाडी गावचे रहिवासी आहेत. हरीश यांना सौदी अरेबियात २० डिसेंबर २०१९ साली अटक झाली होती.
सौदी अरेबियात शिक्षा भोगून ते थेट आता मायदेशी परतले आहेत. बुधवारी बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंगेरा यांची पत्नी सुमना, मुलगी हनीशका आणि मित्र परिवारानं त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते मूळ गावी रवाना झाले.
हरीश बंगेरा सौदी अरेबियात जवळपास ६०४ दिवस तुरुंगात राहिले. सोशल मीडियात एक अपमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या विरोधात बंगेरा यांनी फेसबुकवर अपमानजनक पोस्ट शेअर केली होती. त्याविरोधातील कारवाईत बंगेरा यांना अटक करण्यात आली होती.
अकाऊंट हॅक केल्याचा बंगेरा यांनी केलेला दावामक्का येथे राम मंदिर उभारलं जावं अशा आशयाची पोस्ट हरीश बंगेरा यांच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली होती. मक्का हे जगभरातील मुस्लीम धर्मियांचं एक पवित्र स्थळ आहे. महत्वाची बाब म्हणजे, हरीश बंगेरा यांचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून त्यावरुन चुकीच्या पोस्ट करण्यात आल्याबद्दल उडपी जिल्हा पोलिसांनी दोन भावांविरोधात गुन्ह्याची नोंद केली होती.
आरोप पत्रात नमुद माहितीनुसार अब्दुल असिस आणि अब्दुल तुवेस अशी दोन आरोपींची नावं आहेत. या दोघांनी हारीश बंगेरा यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करुन अपमानकारक पोस्ट केली होती. हरीश यांची पत्नी सुमना यांनी उडपी सायबर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली होती. उडपी पोलिसांनी सर्व पुरावे परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द केले होते. परंतु, सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांकडून यावर खूप वेळ घेतला गेला आणि बंगेरा यांना तोवर तुरुंगातच राहावं लागलं.