नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात पॅसिपिक महासागरात आलेल्या चक्रीवादळात फिलिपाईन्सजवळ एका व्यपारी जहाजाला जलसमाधी मिळाली होती. यामध्ये 26 भारतीय खलाशी होते. त्यामधील 16 जणांना वाचवण्यात यश आले मात्र अद्याप 10 भारतीय बेपत्ता आहेत.
या दहा बेपत्ता भारतीयांचा शोध घेण्यासाठी जपानी तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर आणि दोन गस्ती पथके कार्यरत असल्याची माहिती जपानमधील भारतीय दुतावासाने दिली. त्याचप्रमाणे, त्यांच्या मदतीला भारतीय नौदलाचे P81 जहाजही पोहचलं आहे. अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
हाँगकाँगला नोंदणीकृत असलेले एमराल्ड स्टार हे मालवाहू जहाज हाँगकाँगहून इंडोनेशियाला खनिज पदार्थ घेऊन निघाले होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास फिलिपिन्सपासून 280 किलोमीटर अंतरावर जहाजाला अपघात झाला. या वेळी जहाजावर 26 भारतीय होते. त्यातील 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. जपानचे तटरक्षक दल बचावकार्य करीत आहे.
जहाज अपघातात विरारचे कॅप्टनही बेपत्ताया जहाज अपघातत बेपत्ता असलेल्यांमध्ये विरारमधील कॅप्टन राजेश नायर यांचा समावेश आहे. त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. नायर यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना साकडे घातले आहे. या जहाजावर विरार येथील विराट नगर येथे राहणारे कॅप्टन राजेश नायर होते. अपघातानंतर नायर बेपत्ता आहेत. कॅप्टन नायर यांचे १९९६ साली कुलाबा येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मर्चंट नेव्हीत प्रवेश घेतला. गेली १५ वर्षे ते मर्चंट नेव्हीत कार्यरत आहेत. १९९०पासून नायर आपली पत्नी रेश्मा, मुले वेदान्त (८) आणि इशिता (३) यांच्यासोबत विरारला राहावयास आले आहेत. रेश्मा पश्चिम रेल्वेत वाहतूक निरीक्षक म्हणून चर्चगेट येथे कार्यरत आहेत. राजेश नायर यांचे वडील रामचंद्रन नायर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात इलेक्ट्रीकल ऑफिसर म्हणून कामाला होते. राजेश नायर अद्याप बेपत्ता असल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. जपानच्या कोस्ट गार्डने १६ आॅक्टोबरपर्यंतच शोधमोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नायर कुटुंबीयांची चिंता आणखी वाढली आहे.
शोधमोहीम सुरूच राहणारशोधमोहीम सुरू ठेवण्यात यावी, यासाठी नायर कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला आहे. १६ ऑक्टोबरनंतरही शोधमोहीम सुरूच राहील, अशी ग्वाही स्वराज यांनी नायर कुटुंबीयांना दिली आहे. गेल्या आठवड्यात ३ ऑक्टोबरला नायर यांनी व्हॉट्स अॅप कॉलद्वारे काही मित्रांशी संपर्क साधला होता. या वेळी आपण डिसेंबरला विरारला येणार असल्याचेही त्यांनी मित्रांना सांगितले होते.