दुबई : इराकमधून मायदेशी परतलेल्या ४६ भारतीय परिचारिकांना संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) भारतीय वंशाच्या एका व्यावसायिकाने रोजगार देऊ केला आहे. या परिचारिका इराकमधील सुन्नी बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशात महिनाभर अडकून पडल्या होत्या. सुटकेनंतर त्या नुकत्याच मायदेशी परतल्या आहेत. यूएईतील एनएमसी हेल्थकेअर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. आर. शेट्टी यांनी या परिचारिकांना नोकरीचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती एमएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिली. इराकमधील हिंसाचारामुळे या परिचारिकांचा रोजगार हिरावला गेला असून त्या बेरोजगार झाल्या आहेत. यूएईसह इजिप्त आणि भारतात रुग्णालये असलेल्या शेट्टी यांनी केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांना आपला प्रस्ताव कळविला आहे, असे हा अधिकारी म्हणाला. संघर्षग्रस्त इराकमधील महिनाभराच्या अनिश्चिततेनंतर या परिचारिका शनिवारी मायदेशी परतल्या. आपण कोणत्याही स्थितीत परत जाणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ४६ परिचारिकांपैकी ४५ केरळच्या विविध जिल्ह्यांतील असून एक तामिळनाडूतील तुतीकोरीन येथील रहिवासी आहे.भारतीय परिचारिका तिक्रीत शहरात अडकून पडल्या होत्या. हे शहर सुन्नी बंडखोरांनी गेल्या महिन्याच्या प्रारंभी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून या परिचारिकांबाबत चिंता निर्माण झाली होती. (वृत्तसंस्था)
भारतीय परिचारिकांना ‘यूएई’त नोकरीचा प्रस्ताव
By admin | Published: July 07, 2014 4:43 AM