बीजिंग : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा, अशी मोहीम भारतात जोरात सुरू झाल्याने चीन प्रचंड अस्वस्थ झाला आहे. बहिष्कार टाकण्याचा प्रचार भारतातील प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमातून होत असल्यामुळे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचा जळफळाट झाला आहे. भारतीय वस्तू चिनी वस्तूंची बरोबरी करू शकत नाहीत. भारत केवळ चीनवर भुंकू शकतो, अशी अश्लाघ्य भाषा या वृत्तपत्राने वापरली आहे. ग्लोबल टाइम्सच्या बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अंकात ही टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांना आंतरराष्ट्रीय अतिरेकी घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने खोडा घातल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. याची दखल घेताना ग्लोबल टाइम्सची पातळी बुधवारी घसरली.दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले की, चिनी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करू नये. भारतात प्रचंड भ्रष्टाचार असून, कामगारही मेहनती नाहीत. भारतात गुंतवणूक करणे हे आत्महत्या करण्यासारखेच आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, ही मोहीम निरर्थक आहे. भारतीय उत्पादक कंपन्या चिनी उत्पादनांची बरोबरी करू शकत नाहीत. भारतात अजून नीट रस्ते नाही. महामार्ग नाहीत. वीज आणि पाण्याची तीव्र टंचाई आहे. भरीस भर म्हणजे तळापासून शिखरापर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे. भारत आणि अमेरिकेत मैत्रीपूर्ण संबंध वाढत असल्याच्या मुद्द्यावर ग्लोबल टाइम्सने तोंडसुख घेतले. लेखात म्हटले की, अमेरिका कोणाचाच मित्र नाही. केवळ चीनला रोखण्यासाठी अमेरिका भारताला जवळ करीत आहे. चीनचा विकास आणि जगातील वाढता प्रभाव यामुळे अमेरिकेला मत्सर वाटू लागला आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले की, भारतात भरपूर पैसा आहे. तथापि, त्यातील बहुतांश पैसा राजकारणी, नोकरशहा आणि काही भांडवलदार यांच्या हातात एकवटला आहे. भारतातील अभिजन वर्ग उपलब्ध पैसा देशासाठी खर्च करायला तयार नाही. करदात्यांचा पैसा भारतातील सरकारे वैयक्तिक सुखोपभोगासाठी खर्च करीत आहेत. (वृत्तसंस्था)>मेक इन इंडिया अव्यवहार्यलेखात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ ही मोहीम अव्यवहार्य आहे. चिनी कंपन्यांनी भारतात कारखाने उभे करण्याऐवजी चीनमध्येच कारखाने उभे करावेत. भारतीय कंपन्यांना चीनमध्ये येऊन माल खरेदी करू द्या. चीनमध्ये उत्पादित माल भारतात नेऊन विकण्याचे मॉडेलच उत्तम आहे. >चीनचा तिसऱ्या तिमाहीतील वृद्धीदर ६.७ टक्के राहिलायंदाच्या तिसऱ्या तिमाहीतील चीनचा आर्थिक वृद्धी दर ६.७ टक्के राहिला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येऊन स्थिर होत असल्याचे यातून दिसून येते. नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅटिक्सच्या (एनबीएस) आकडेवारीनुसार, २0१६ साठी सरकारने जाहीर केलेल्या ६.५ ते ७.0 टक्के वृद्धी दराच्या अंदाजाला अनुरूप असाच हा दर आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली. त्यानुसार, तिमाही आधारावर चीनची अर्थव्वस्था आदल्या तिमाहीच्या तुलनेत १.८ टक्के वाढली. जीडीपीचा वृद्धी दर २0१६ च्या पहिल्या तीन तिमाहीत ६.७ टक्के राहिला. देशांतर्गत उत्पादन ७,८७0 अब्ज डॉलर राहिले. एनबीएसचे प्रवक्ते शेंग लेईयून यांनी सांगितले की, सकळ मागणी, पुरवठाधिष्ठित संरचनात्मक सुधारणा आदिंमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची वृद्धी मजबूत राहिली. जारी झालेल्या आकड्यांनुसार २0१६ च्या पहिल्या तीन तिमाहीत म्हणजेच नऊ महिन्यांत औद्योगिक उत्पादन ६.0 टक्क्यांनी वाढले.
भारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका
By admin | Published: October 20, 2016 6:22 AM