इस्लामाबाद : पाकिस्तानी वृत्तपत्रांनी येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या ८ अधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध करून हे अधिकारी पाकविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप केला आहे. भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असताना पाकच्या माध्यमांनी प्रत्युत्तर म्हणून ही नावे प्रसिद्ध केली. तत्पूर्वी पाकमधील आठ भारतीय मुत्सद्यांंची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आल्याने त्यांना परत बोलविण्याच्या विचारात असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.मात्र, पाक माध्यमांनी ८ कर्मचाऱ्यांची नावे प्रसिद्ध करून ते पाकिस्तानविरोधी कारवायांत गुंतल्याचा आरोप केला. पाकने हेरगिरी कारवायांसाठी कथितरित्या ज्या ८ भारतीय अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले त्यांची नावे फुटली. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, या ८ जणांत वाणिज्यिक समुपदेशक राजेश कुमार अग्निहोत्री, प्रसिद्धी आणि संस्कृति सचिव बलबिरसिंग, वाणिज्य सचिव अनुरागसिंग, अमरदीपसिंग भट्टी, धर्मेंद्र, विजयकुमार वर्मा, माधवन नंदकुमार आणि जयबालन सेंदील यांचा समावेश आहे. हे अधिकारी भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’साठी किंवा भारतीय गुप्तचर विभागासाठी काम करीत होते, असे पाकिस्तानी दैनिकांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>उलट्या बोंबा!भारताचे आठ कर्मचारी विध्वंसक कृत्यात सहभागी असल्याचे आढळून आले. त्यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला अडथळा आणण्याचा तसेच देशात अराजक आणि दहशतीचे वातावरण पसरविण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही करण्यात आला आहे. आगामी काळात पाकिस्तान प्रशासन या आठ जणांची हकालपट्टी करू शकतो. >भारतातर्फे धिक्कार भारतीय अधिकाऱ्यांना निष्कारण अडकावण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत असून, काही कारण नसताना त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. याचा भारत धिक्कार करतो. - विकास स्वरूप, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय
भारतीय अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप
By admin | Published: November 04, 2016 4:26 AM