ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - सीमेवरील गोळीबार आणि भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे भारत-पाकिस्तानमध्ये आधीच तणाव वाढलेला असताना शुक्रवारी पाकिस्तानी न्यायालयात भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिका-याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याची घटना घडली. पियुष सिंह यांनी त्यांच्या मोबाईलवरुन न्यायालयात फोटो काढले म्हणून त्यांचा मोबाईल जप्त केला होता अशी माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली.
उझमा या 20 वर्षीय भारतीय महिलेसाठी पियुष सिंह इस्लामाबादमधील न्यायालयात आले होते. त्यावेळी फोन जप्तीची ही घटना घडली. फोन ताब्यात घेतल्यानंतर काहीवेळाने पियुष सिंह यांना त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. त्यांच्यावर कोणताही आरोप ठेवला नाही. आपण मोबाईलवर मेसेज टाईप करत होतो. फोटो काढले नाहीत असे पियुष सिंह यांनी सांगितले.
दरम्यान उझमा सध्या इस्मालामबादमधील भारतीय दूतावासामध्ये रहात आहे. जो पर्यंत आपल्याला भारतात परतण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत आपण दूतावास सोडणार ऩाही असे उझमाने म्हटले आहे. उझमाचे ताहीर अली या पाकिस्तानी नागरीकाबरोबर लग्न झाले असून, हे लग्न जबरदस्तीने लावल्याचा आरोप उझमाने केला आहे.
उझमाची ताहीरबरोबर मलेशियामध्ये ओळख झाली होती. उझमाला जेव्हा ताहीरचे पहिले लग्न झाले असल्याचे समजले तेव्हा तिने घटस्फोट घेतला. दरम्यान ताहीर अलीने भारतीय दूतावासच्या अधिका-यांनी उझमाच्या इच्छेविरुद्ध तिला ताब्यात ठेवल्याचा आरोप केला आहे.