Britain Crime : गेल्या काही महिन्यांपासून परदेशामध्ये भारतीय नागरिकांच्या हत्यांचे प्रमाण वाढत चालल्याचे चित्र आहे. अनेकदा शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथल्या स्थानिकांकडून लक्ष्य केलं जातं. अशातच आता लंडनमध्ये भारतीय वंशाच्या एका वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. ही व्यक्ती मूळची पंजाबची होती. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी पाच संशयित अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. या घटनेनं ब्रिटन आणि संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे.
भीम सेन कोहली असे हत्या झालेल्या ८० वर्षीय वृद्धाचे नाव आहे. भीम सेन कोहली यांच्यावर हल्ला करणारी मुले १२ ते १४ वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी मुलांना चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. यामध्ये दोन मुलींचा देखील समावेश आहे. भीम सेन रविवारी फ्रँकलिन पार्कमध्ये श्वानाला फिरवत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. कोहलींवरील हल्ल्यानंतर हल्लेखोर मुले पळून गेली.
या हल्ल्यानंतर भीस सेन कोहली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी रात्री कोहली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लेस्टरशायर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर दोन अल्पवयीन मुले आणि तीन अल्पवयीन मुलींना हत्येच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांची पोलीस चौकशी करत आहेत. हल्ल्याचे कारण आणि इतर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
भीम सेन कोहलींच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी कोहलींच्या मानेला आणि मणक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली. भीस सेन यांच्या मुलीने सांगितले की त्या मुलांनी त्यांच्या मानेवर आणि मणक्यात लाथ मारली. ते श्वानाला फिरायला घेऊन गेला होते. हल्ला झाला तेव्हा ते घरापासून केवळ ३० सेकंदांच्या अंतरावर होते. ते झाडाखाली पडले होते आणि मानेला लागल्याची तक्रार करत होते.
माझे वडील नेहमीच सक्रिय असायचे. आम्ही येथे ४० वर्षांपासून राहतो. पण पहिल्यांदाच आमच्यासोबत असं घडलं, असेही कोहलींच्या मुलीने सांगितले. फ्रँकलिन पार्कमध्ये भीम सेन कोहली श्वानाला फिरवत होते. तेव्हा रविवारी त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.