Indian Man Shot in America: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत भारतीयांच्या हत्येचे सत्र सुरुच आहेत. अशातच अमेरिकेत भारतीय वंशाच्या नवविवाहित तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हा सगळा कॅमेरात कैद झाला असून पुन्हा एकदा अमेरिकेत भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासात त्रुटी असल्याचा आरोप करत आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. पतीची समोरच हत्या झाल्याने पत्नीदेखील धक्क्यातून सावरलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अमेरिकेच्या इंडियाना राज्यात भारतीय वंशाच्या २९ वर्षीय गेविन दसौरची एका रोड रेजच्या घटनेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नवविवाहित गेविन दसौर आपल्या मेक्सिकन पत्नीसह घरी जात होता. त्यानंतर वाद झाल्यानंतर आरोपीने इंडी शहराच्या एका चौकात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागताच दासौर खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. दसौर कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेविन आणि ट्रक ड्रायव्हरमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला, त्यानंतर ट्रक ड्रायव्हरने त्याच्यावर गोळीबार केला.
गेविन हा अमेरिकेत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा. १६ जुलै रोजी संध्याकाळी गेविन आणि त्याची पत्नी आणि बहीण दीपशी एका मॉलमध्ये गेले होते. घरी परतत असताना एका पिकअप ट्रकने त्यांना धडक दिली, त्यामुळे त्यांची गाडी रस्त्यावरून खाली उतरली. गेविनने ट्रकचा पाठलाग करून त्याला थांबवले, पण चालकाने गेविनला हसून दाखवले. त्यानंतर पिकअप चालकाने अचानक गेविनवर तीन गोळ्या झाडल्या.
गेविन हा आग्र्याचा रहिवासी होता. त्याच्या मृत्यूच्या दोन आठवडे आधी म्हणजे २९ जून रोजी त्याचे विवियाना झामोरासोबत लग्न झाले होते. मात्र काही दिवसातच त्याची हत्या झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दसौर हा एका चौकात आपल्या गाडीवरुन उतरुन पिकअप ट्रकच्या चालकावर ओरडताना दिसत आहेत. यानंतर तो हातात बंदूक घेऊन ट्रकच्या दरवाजावर हात मारतो. त्यानंतर पिकअप ट्रकचा चालक त्याच्याजवळील बंदुकीने दसौरवर गोळ्या चालवतो.