लंडन- जगभरात भारतीय वंशांच्या लोकांनी विविध पदांवर चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. राजकारण, अर्थकारण, प्रशासन, अंतराळ विज्ञान, साहित्य, संशोधन, संगणकशास्त्र अशा विविध विषयांमध्ये भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे. आता जगातील सर्वात उत्कृष्ठ तपास यंत्रणा मानल्या जाणा-या स्काँटलंड यार्डच्या दहशतवाद विरोधी विभागाची धुरा भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे येणार आहे. माजा मेट्रोपोलिटन कमांडर असणा-या या व्यक्तीचं नाव नील बासू असं आहे.
नील बासू सध्या मेट्रोपोलिटन पोलीस डेप्युटी असिस्टंट कमिशनर पदावरती कार्यरत आहेत. त्यांचे वडील भारतीय वंशाचे नागरिक होते. बासू यांनी दहशतवादी आणि गुन्हेगारांच्या सघटनांविरोधात आजवर भरपूर काम केले आहे. सीरिया आणि इराकमध्ये जाऊन आयसीसमध्ये सहभागी होण्याच्या ब्रिटीश नागरिकांच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे.
सध्या बासू यांचं नाव या महत्त्वाच्या पदासाठी आघाडीवर असलं तरी मेट्रो पोलीस असिस्टंट कमिशनर पदावरती कार्यरत असणा-या हेलेन बॉल, वेस्ट मिडलँड चिफ कॉन्स्टेबल डेव्ह थॉम्प्सन यांचेही नाव चर्चेत आहे. युरोपमधून आयसीसमध्ये जाणा-या व्यक्ती आणि युरोपातील दहशतवादी संघटना व घातपाती घटना यांच्याकडे पाहिल्यास नील यांना अत्यंत मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल असे दिसते.