इस्लामाबाद : माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय मिळविलेलल्या पीटीआयचा अध्यक्ष इम्रान खान याची भारताचेपाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी आज भेट घेतली. यावेळी बिसारिया यांनी निवडणुकीतील विजयाबाबत इम्रान खानला शुभेच्छा दिल्या. तसेच सीमेपलिकडून होणारा दहशतवाद आणि काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली.
इम्रान खान हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची येत्या 18 ऑगस्टला शपथ घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर बिसारिया यांनी त्यांची पहिल्यांदाच भेट घेत भारतीय संघाच्या स्वाक्षऱ्या असलेली बॅट भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये बिसारिया यांनी सीमेपलीकडून होणारा आतंकवाद आणि घुसखोरीचा मुद्दा उचलला. तर इम्रान यांनी काश्मीर मुद्दा आणि भारतीय सैन्याकडून होणाऱ्या कथित मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा उचलला.
बिसारिया यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली. इम्रान खान सोबतची चर्चा सकारात्मक आणि मुद्देसुद झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्याचेही सांगितले. मोदी यांनी 30 जुलै रोजीच फोनवर इम्रान खानला शुभेच्छा दिल्या होत्या.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान खानने दोन्ही देशांदरम्यान काश्मीरसंबंधीच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर चर्चेची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु करण्यावर भर दिला होता.