लंडन : येथील कारागृहातून अपघाताने सुटका झालेल्या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने दोन आठवडे स्वातंत्र्याचा मनसोक्त उपभोग घेतल्यानंतर सोमवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. हॉफमन सिंग असे या नशीबवान कैैद्याचे नाव आहे. वस्तुत: सिंग याला न्यायालयीन सुनावणीसाठी पाठवायचे होते; मात्र उत्तर लंडनमधील पेन्टोविले कारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसविण्याऐवजी टॅक्सीने घरी पाठविले. चुकून झालेल्या सुटकेचा सिंगने मनमुराद आनंद लुटला. एवढेच नाही तर त्याने नॉटिंग हिल कार्निव्हल येथे तैनात पोलिसांसोबत सेल्फीही घेतला. वास्तविक मी तुरुंगात गजाआड असायला हवे होते; मात्र मी बाहेर पार्टी करीत होतो, असे सिंग याने सांगितले. गेल्या सहा आठवड्यांत मला किरकोळ गुन्ह्यांसाठी चार वेळा अटक करण्यात आली. शेवटच्या गुन्ह्यानंतर न्यायाधीशांचा संयम संपला आणि त्यांनी माझी कोठडीत रवानगी केली, असे सिंग यांनी ‘द सन’ या वृत्तपत्राला सांगितले. सिंग हे एका कुरिअर प्रतिष्ठानाचे मालक आहेत. २५ आॅगस्ट रोजी मला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार होते; मात्र मला नेण्यासाठी कोणीही आले नाही. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मी वृत्तपत्र वाचत असताना तुरुंगरक्षक आला आणि त्याने मला सामान बांधण्यास सांगितले. सामान बांध तुला घरी पाठविण्यात येत आहे, असे तो म्हणाला. मला काही समजले नाही; परंतु चुपचाप त्याच्यासोबत बराकीबाहेर पडलो. कदाचित आपल्यावरील आरोप वगळण्यात आले असावेत, असे मला वाटले. गफलतीने हे घडते आहे असा पुसटसाही विचार मनाला शिवला नाही. सिंग याच्यावर दारू पिऊन मारहाण करणे, दारू पिऊन गाडी चालवणे आणि वांशिक अभद्र भाषेचा वापर करणे आदी आरोप आहेत.सिंग यांनी आपल्या वकिलाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. (वृत्तसंस्था)त्यांनी सिंग यांना शरणागती पत्करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सिंग पोलिसांसमोर हजर झाले. ब्रिटनच्या कारागृह सेवेने सिंग यांची चुकून सुटका झाल्याचे मान्य केले.
भारतीय वंशाच्या कैैद्याची गफलतीने तुरुंगातून सुटका
By admin | Published: September 06, 2016 3:48 AM