इस्लामाबाद : भारतातील सत्ताधारी पक्ष भाजपा हा मुस्लिमविरोधी असून माझ्याकडून दिले गेलेले शांतीप्रस्ताव धुडकावून लावल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असे म्हटले आहे.
जुलैमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्या भाषणात इम्रान खान यांनी भारताने एक पाऊल पुढे टाकल्यास पाकिस्तान दोन पावले पुढे टाकेल, असे सांगितले होते. तसेच नुकत्याच सार्क देशांच्या सम्मेलनाला सहभागी होण्यासाठी इम्रान खान यांनी निमंत्रण दिले होते. यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चर्चा आणि दहशतवाद एकाचवेळी होऊ शकत नसल्याचे सुनावले होते.
मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झालेली भारताला पाहायची असल्याचे असे विचारल्यावर इम्रान यांनी या प्रकरणी सध्याची पाकिस्तानमधील प्रगती काय आहे याची माहीती घेत आहे. ही दहशतवादाशी जोडलेली घटना होती, ती आम्हाला सोडवायची आहे. जेव्हा भारतात निवडणुका होतील त्यावेळीच दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तान कोणत्याही दहशतवादी गटाला आसरा देत नाहीय. सुरक्षा दले मला माहिती देत असतात. पाकिस्तानात कुठे-कुठे दहशतवादी गट सक्रीय आहेत, हे अमेरिकेने सांगावेच, असे आव्हानही त्यांनी दिले. अमेरिकेला 1980 मध्ये अफगाणिस्तानमध्ये मदत करून पाकिस्तानचेच नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी पाकचे 80 हजार सैनिक-नागरिक मारले गेल्याचा दावा त्यांनी केला. एवढे असूनही लादेनला मारताना अमेरिकेचा आमच्यावर विश्वास नव्हता असा आरोपही त्यांनी केला.